गंगापूर धरणात दोघे तरूण बुडाले; एकाचा मृत्यू
By admin | Published: April 19, 2017 08:46 PM2017-04-19T20:46:42+5:302017-04-19T20:46:42+5:30
येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरूण संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
नाशिक : येथील सावरखेड गावाच्या शिवारात असलेल्या गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यास गेलेले दोघे तरूण संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, तासाभराने एका तरूणाचा मृतदेह पोलिसांना जलाशयामधून काढण्यास यश आले तर दुसऱ्या तरूणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य नाशिक अग्निशमन विभागाचे जवान व पोलीस युध्दपातळीवर करीत आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोवर्धन शिवारात असलेल्या एका वाईन फॅक्टरीमध्ये डेकोरेशन करण्यासाठी आठ ते दहा तरुण शहरातील विविध भागांमधून आले होते. काम आटोपल्यानंतर संध्याकाळी गंगापूर धरणावरील रम्य वातावरण व सुर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी हे सर्व मित्र जवळच्या सावरखेड गावालगत असलेल्या बॅक वॉटरवर पोहचले. यावेळी इश्तियाक शेख (१९,रा. लेखानगर), अभिनव सेन (२०, रा इंदिरानगर) यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही व हे दोघे पाण्यात उतरले. दरम्यान, पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी दोघेही पाण्यात बुडाल्याचे बघून त्यांच्या मित्रांनी पोलीस मुख्यालयासह, अग्निशमन मुख्यालयाला सदर बाब तातडीने भ्रमणध्वनीवरून कळविली. घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव अग्निशमन मुख्यालयाचा एक बंब व नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे गस्त पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. पोलीस प्रथम घटनास्थळी पोहचले व शोधकार्याला सावरगाव ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांच्या मदतीने प्रारंभ केला आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून जॅकवेलच्याजवळ असलेल्या डोहाजवळून शेख याचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना यश आले; मात्र सध्या बेपत्ता सेनचा शोध अग्निशमन विभागाचे जवान व ग्रामरक्षक दलाचे कार्यकर्ते घेत आहे. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.