जळगाव खुर्दला मोफत धान्य विक्री केल्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:11 AM2021-06-17T04:11:45+5:302021-06-17T04:11:45+5:30
नांदगाव : तालुक्यातील जळगाव खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानातील सेल्समनने शासनाकडून नियमित मिळणारे व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील मिळणारे ...
नांदगाव : तालुक्यातील जळगाव खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानातील सेल्समनने शासनाकडून नियमित मिळणारे व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील मिळणारे धान्य शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना दिले नसल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ग्राम दक्षता सभेचे आयोजन करून या प्रश्नाकडे पुरवठा विभागाचे लक्ष वेधण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावाचे माजी उपसरपंच रावसाहेब सरोदे यांनी संबंधित सेल्समनला विचारणा केली व त्याचा व्हिडिओ गावासह तालुक्यातील सोशल मीडियावर अपलोड केला. यावेळी सेल्समनने खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रारही सरोदे यांनी तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्याकडे केली. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून, याबाबत मंगळवारी (दि.१५) गावात ग्राम दक्षता सभा बोलावण्यात आली. यात धान्य मिळत नसल्याच्या घटनेचे पडसाद उमटले. ग्राम दक्षता सभेच्या सचिव व महिला तलाठी रिमा भागवत यांनी सेल्समनविरोधातील तक्रारींचे वाचन केले. यावेळी संशयित सेल्समन अनुपस्थित असल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याची माहिती भागवत यांनी ग्रामसभेत दिली. दरम्यान, मोफत धान्य असतानाही ते खरेदी करावे लागल्याच्या प्रश्नावरून हा विवाद आता पुरवठा विभागाकडे गेला असून, पुढील कारवाईकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
इन्फो
धान्य वितरणाचे गूढ
गावातील स्वस्त धान्य दुकान हे स्थानिक विविध कार्यकारी सोसायटीच्या ताब्यात असून, अध्यक्ष बाळनाथ सरोदे व त्यांच्या संचालक मंडळाने याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. असे असले तरी मे महिन्यातील धान्य कुठे गेले, याचे गूढ कायम राहिल्याने तहसीलदारांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
फोटो - १६ जळगाव खुर्द
जळगाव खुर्द येथे शासनाचे मोफत धान्य योजनेतील अपहार व संशयास्पद विक्रीच्या मुद्द्यांवर गावकऱ्यांच्या ग्रामदक्षता सभेत इतिवृत्ताचे वाचन करताना तलाठी रिमा भागवत.
===Photopath===
160621\16nsk_55_16062021_13.jpg
===Caption===
फोटो - १६ जळगाव खुर्द जळगाव खुर्द येथे शासनाचे मोफत धान्य योजनेतील अपहार व संशयास्पद विक्रीच्या मुद्दयांवर गावकऱ्यांच्या ग्रामदक्षता सभेत इतिवृत्ताचे वाचन करताना तलाठी रीमा भागवत.