वैजापूरसाठी पाणी पळविण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 11:14 PM2016-06-14T23:14:45+5:302016-06-14T23:42:11+5:30

प्रशासन झोपेत : नांदगाव तालुक्यातील कासारीची घटना

The type of waterfall for Vaijapur | वैजापूरसाठी पाणी पळविण्याचा प्रकार

वैजापूरसाठी पाणी पळविण्याचा प्रकार

Next


नाशिक : पाण्याच्या समन्यायी वाटपाचा मुद्दा उपस्थित करून नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी पळविणाऱ्या मराठवाड्याने गोदावरी तर कोरडी केलीच, परंतु नाशिक जिल्ह्यातील झोपेत असलेल्या प्रशासकीय यंत्रणेची नजर चुकवून वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी नांदगाव तालुक्यातील कासारी येथील धरणातून टॅँकरद्वारे पाणी पळविल्याची बाब मंगळवारी उघडकीस आली आहे. गटविकास अधिकाऱ्यांना याची खबर मिळाल्यावर त्यांनी तातडीने वैजापूरसाठी पाणी वाहून नेणारे टॅँकर पिटाळून लावल्याने काही प्रमाणात पाणीचोरी रोखली गेली असली तरी, या पाण्यावर पुन्हा डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा नांदगाव तालुका पिण्याच्या पाण्याच्या टंचाईशी सामना करीत असून, सद्यस्थितीत २१ गावे व १६१ वाड्यांना ३९ टॅँकरद्वारे १२६ फेऱ्यांद्वारे जनतेची पाण्याची तहान भागविली जात आहे. तालुक्यातीलच मनमाड शहराला दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जात असून, नांदगाव तालुक्याला वरदान ठरू पाहणाऱ्या नाग्या-साक्या धरणात फक्त मृतसाठा उरला आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता पाहता नांदगाव तालुक्यातील कासारी येथील मध्यम प्रकल्पात अत्यावश्यक बाब म्हणून साडेतीन दशलक्ष घनफूट पाणी प्रशासनाने राखून ठेवले होते. सध्या नांदगाव तालुक्याला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे स्त्रोत आटू लागले असून, पाऊसही लांबणीवर पडल्याने कासारी येथील धरणावरच सारी भिस्त अवलंबून असताना गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर तालुक्यातील २७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅँकरद्वारे पाणी पळविण्यात येत असल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी काही टॅँकर या धरणातून पाणी घेत असल्याची बाब जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीन गटविकास अधिकारी श्रीमती कोठावळे यांच्याशी संपर्क साधून खात्री केली असता, त्यांना धक्काच बसला. कोणत्याही परवानगीविना वैजापूर तालुक्यासाठी धरणातून गेल्या काही दिवसांपासून ५० टॅँकरद्वारे पाणी पळविण्यात येत होते, विशेष म्हणजे धरणातून पाणी उपसण्यासाठी वैजापूरच्या गटविकास अधिकाऱ्याने चार इंजिनही बसविल्याचे उघडकीस आले. नांदगावची जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना तेथील पाण्यावर विनापरवानगी डल्ला मारण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत श्रीमती कोठावळे यांनी तातडीने टॅँकर परत पाठविले आहेत.

Web Title: The type of waterfall for Vaijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.