ज्येष्ठ महिलांचे मंगळसूत्र ओरबाडण्याचे प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:14 AM2019-08-28T00:14:46+5:302019-08-28T00:15:07+5:30
येथील एका अपार्टमेंटच्या आवारात जाऊन एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे ४५ हजार रु पये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे.
इंदिरानगर : येथील एका अपार्टमेंटच्या आवारात जाऊन एका वृद्धेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुमारे ४५ हजार रु पये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. इंदिरानगर भागात सातत्याने सोनसाखळी ओढून पोबारा करण्याच्या घटना घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नलिनी कुलकर्णी (७०, रा. चेतनानगर) या अपार्टमेंटच्या शेजारी असलेल्या किराणा दुकानात सामान घ्यायला सकाळच्या सुमारास आल्या. सामान घेऊन त्या पुन्हा घराकडे परतत असताना त्यांना एका दुचाकीस्वाराने हटकले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला. सुदैवाने यावेळी कुलकर्णी यांचा तोल गेला नाही व त्यांना जबर दुखापत झाली नाही. मात्र या घटनेनंतर त्या प्रचंड घाबरल्या. इंदिरानगर परिसरात सोनसाखळी लांबविण्याच्या घटना नागरिकांच्या दारापुढे घडत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. इंदिरानगर परिसर ज्येष्ठ नागरिकांची वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सकाळ-संध्याकाळ परिसरातील रस्त्यांवर त्यांची वर्दळ असते. याचवेळी चोरट्यांकडून त्यांना लक्ष्य केले जात आहे.