पाण्यासाठी लाक्षणिक उपोषण
By admin | Published: June 20, 2016 11:56 PM2016-06-20T23:56:40+5:302016-06-21T00:07:02+5:30
सटाणा : नदीजोड प्रकल्पात उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे नेण्यास विरोध
सटाणा : नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातकडे पळविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर प्रसंगी रक्त सांडू पण आमचे हक्काचे पाणी जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्रबापू पाटील यांनी दिला.
नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली उत्तर महाराष्ट्राचे हक्काचे पाणी पळविणे बंद करा व मांजरपाडा-२ चे काम तत्काळ सुरू करा, या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर रामचंद्रबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मुळातच तापी खोरे हे त्रुटीचे खोरे आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध करणे आवश्यक आहे. पाणी उपलब्ध करण्यासाठी पश्चिमेकडून अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळण योजनांद्वारे गिरणा, गोदावरी खोऱ्यात टाकणे गरजेचे असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली हे पाणी गुजरातकडे पळवून नेण्याचा घाट घालत असल्याची टीका उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच मांजरपाडा-२ च्या कामाला अद्यापही मुहूर्त सापडत नाही. राज्यकर्त्यांनी उदासीनता झटकून या प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी केली आहे. सायंकाळी तहसीलदार सुनील सौंदाणे यांना उपोषणकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले, त्याप्रसंगी रामचंद्रबापू पाटील यांनी उपरोक्त इशारा दिला. लाक्षणिक उपोषणात के. एन. अहिरे, दिनकर जाधव, मविप्रचे संचालक डॉ. तुषार शेवाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय भामरे, यशवंत अहिरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाध्यक्ष सुभाष नंदन, शरद शेवाळे, संजय चव्हाण, धर्मराज खैरनार, जिल्हा परिषद सदस्य शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, अनिल चव्हाण, भिकानाना सोनवणे, विजय वाघ, काका रौंदळ, संजय देवरे, शक्ती दळवी, ज. ल. पाटील, कुबेर जाधव, संजय पवार, सुभाष अहिरे, अतुल पवार, नितीन भामरे, मनोहर देवरे, उदय अहेर, बळीराम जाधव आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)