उदे गं अंबे उदे : लाखोे भाविक देवीच्या चरणी लीन
By admin | Published: October 2, 2016 12:56 AM2016-10-02T00:56:14+5:302016-10-02T00:56:25+5:30
शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ
पांडाणे : आई सप्तशृंगी माता की जय, जय अंबे माता की जय, अशा भाविकांकडून होणाऱ्या जयघोषात साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या गडावरील सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
सकाळी ७ वाजता न्यासाच्या कार्यालयातून अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अरुण माधव ढवळे यांच्या हस्ते महापूजा व घटस्थापना मंत्रघोषात मातेची महापूजा करण्यात आली. मंदिरातील गाभारा विविध फुलांनी व विद्युत रोषणाईने सजावट केल्याने वातावरण प्रसन्न होते. श्री आई भगवतीस पंचामृत महापूजा करून दुपारी १२ वा महानैवेद्य दाखवून आरती करण्यात आली.
शनिवार सुट्टीचा दिवस व पहिलीच माळ असल्याने एक ते सव्वा लाख भाविक दर्शनासाठी गडावर दाखल होते. आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीच्या अलंकारांची विधिवत पूजा करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी सहपत्नी व जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा न्यासाचे अध्यक्ष श्रीमती यू. एन. नंदेश्वर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी विश्वस्त रावसाहेब शिंदे, विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, तहसीलदार कैलास चावडे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षारक्षक अधिकारी पंडित कळमकर, सागर निचित, गोपीनाथ आंबेकर, कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुजन घाटगे, देशमुख आदि उपस्थित होते. (वार्ताहर)