सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 06:26 AM2024-05-17T06:26:36+5:302024-05-17T06:27:43+5:30
महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : लोकसभा निवडणुकीत इकबाल मुसा स्फोटातील आरोपी विरोधकांचा प्रचार करतोय. भारतात उद्धवसेनेने सत्ता मिळविण्यासाठी आपली प्रतिष्ठा घालविली असून आपल्याकडे पाकिस्तानचे झेंडे फडकवलेले चालतील का? याचे उत्तर उद्धवसेनेने द्यावे. बाळासाहेब ठाकरे यांचा तिरस्कार आयुष्यभर ज्यांनी केला त्यांनाच त्यांनी (उद्धव ठाकरे) मांडीवर घेतले आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला.
महायुतीचे उमेदवार हेमंत गाेडसे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी बाइक रॅली काढण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विजयाची रॅली आम्ही आज काढली. महासत्तेकडे नेण्याचा केलेला प्रयत्न या निवडणुकीत कामी येईल. घरी बसून राज्य करता येत नाही, फेसबुकवर राज्य चालवता येत नाही, तर लाेकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करावे लागते, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.
प्रामाणिकपणे प्रचार करा, मोदींचे कार्य आहेच
आराम करतो, नाश्ता करतो, असे करू नका. अहोरात्र प्रामाणिकपणे प्रचाराचे काम करा, ७० टक्क्यांहून अधिक मतदान व्हायलाच हवे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान मोदी यांनी दहा वर्षांत या देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी जे-जे काम केले ते सर्व आपल्याला कामी येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.