उबाठाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 03:01 PM2024-03-07T15:01:32+5:302024-03-07T15:02:15+5:30
नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली होती.
विजय शिंदे
मालेगाव - नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अपहारप्रकरणी गेल्या सुमारे चार महिन्यांपासून तुरूंगात असलेले उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
मालेगावच्या जिल्हा व अपर सत्र न्यायालयात बुधवारी हिरे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली होती. गुरूवारी (दि.७) न्या. एस.यू. बघेले यांनी अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळून लावला. त्यामुळे अद्वय हिरे यांच्या तुरूंगात पुन्हा मुक्काम वाढला आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक करण्यात आली होती.
अद्वय हिरे यांनी रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने ३० कोटींच्या वर रक्कम गेली होती. त्यामुळे हिरे यांच्यावर ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. हिरे हे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.