आदित्यपेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे: रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:43 AM2019-10-13T01:43:23+5:302019-10-13T01:45:29+5:30
विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
नाशिक : विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेचा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याबाबत प्रचार सुरू आहे ते पाहता, आदित्यपेक्षा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले अधिक चांगले असेल, असे मत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. राज ठाकरे हे बळ नसलेले नेते असल्यामुळे ते विरोधी पक्षनेते होणार नाहीत, त्यासाठी त्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला.
नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार स्वबळावर निवडून येण्याइतपत पक्षाची ताकद नसल्यामुळे आम्ही महायुतीत सहभागी झालो. त्यात रिपाइंला सहा जागा देण्यात आल्या. एका जागेवर सेनेचा उमेदवार असून, पाच जागा रिपाइं लढत आहे. रिपाइंच्या सर्व उमेदवार कमळाचे चिन्ह घेऊन लढत असले तरी, विधिमंडळात त्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला असल्याचेही आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत पुन्हा युतीचीच सत्ता येणार असल्याचा दावा आठवले यांनी केला असून, आपल्या उमेदवारांनी कमळाचे निवडणूक चिन्ह घेतले म्हणून आपण भाजपामध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांनी सक्षम विरोधी पक्षनेते पदासाठी जनतेकडे कौल मागितल्याच्या प्रश्नावर बोलताना आठवले यांनी राज ठाकरे हे बळ
नसलेले नेते असून, त्यांना कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही. त्यासाठी
त्यांनी कॉँग्रेस आघाडीत सामील व्हावे, असे सांगितले.
पवारांवर गुन्हा चुकीचाच
ईडीने शरद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणे चुकीचे असून, पवार हे कोणत्याही बॅँकेत संचालक नव्हते. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला असावा, असेही आठवले म्हणाले.