EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:51 PM2024-11-28T14:51:58+5:302024-11-28T14:53:07+5:30

निकालावर बडगुजर यांनी शंका उपस्थित करून १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटची सखोल पडताळणीची मागणी निवडणूक शाखेकडे केली होती.

uddhav Thackerays candidate demand for counting of EVM votes and vvpat slips But then different information came out | EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!

EVM मते आणि चिठ्ठ्या मोजण्याची ठाकरेंच्या उमेदवाराची मागणी मान्य; पण नंतर समोर आली वेगळीच माहिती!

नाशिक : नाशिक पश्चिम मतदारसंघात १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठया यांच्या सखोल पडताळणीची मागणी उद्धवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केली होती. मात्र, आयोगाच्या नियमानुसार निकाल जाहीर होण्याआधीच मतदानाची पुनर्तपासणी करण्यात येते, नंतर मात्र फक्त मॉक ड्रिल होत असल्याचे कारण देण्यात आल्यानंतर त्यास बडगुजर यांनी नकार दिला. त्यामुळे बडगुजर यांचा दावा आता निकाली निघणार असल्याचे समजते. 

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून निकालाविषयी शंका उपस्थित केली जात आहे. मतमोजणी आधी सुधाकर बडगुजर यांनी सात केंद्रांत मतदान यंत्र अथवा व्हीव्हीपॅट परस्पर बदलण्यात आल्याचा आरोप केला होता. परंतु, निवडणूक शाखेने ते फेटाळले. आता निकालावर बडगुजर यांनी शंका उपस्थित करून १२९ मतदान केंद्रांतील मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटची सखोल पडताळणीची मागणी निवडणूक शाखेकडे केली. त्या केंद्रांची यादी त्यांनी सादर केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्यास लेखी उत्तर दिले. त्यानुसार यासाठी पाच टक्के केंद्रांच्या निकषानुषार प्रति मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटसाठी ४० हजार रुपये आणि १८ टक्के जीएसटी यानुसार शुल्क विहित मुदतीत भरावे लागेल. शुल्क भरल्याची पावती सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीईएल कंपनीचे अभियंता यांच्याकडून उमेदवारासमोर मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राची तपासणी केली जाईल, असे त्यात म्हटले होते. 

सुधाकर बडगुजर बुधवारी (दि. २७) जिल्हाधिकारी कार्यालयात हजरही झाले होते. मात्र, तपासणी म्हणजे फेरमतमोजणी किंवा फेरपडताळणी नाही. उमेदवार ज्या पाच टक्के केंद्रावरील यंत्र सांगतील, त्यावर मतदानाचे प्रात्यक्षिक होईल. म्हणजे, या यंत्रावर नव्याने ५०० किंवा हजार मतदान केले जाईल. हे मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्रावरील चिठ्ठयांची पडताळणी करून ती यंत्रे योग्यप्रकारे कार्यरत असल्याची उमेदवाराला खात्री करून दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत बडगुजर यांनी नकार दिला. त्यात आपली तक्रार निकाली निघेल, असा विश्वास नसल्याने नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, "प्रत्यक्ष मतदान झालेल्या यंत्रांमधील मतदान मोजण्याची माझी मागणी होती, मात्र त्या ऐवजी पुन्हा नव्या यंत्रांची मोजणी करण्यात येणार असल्याचे समजले. मॉक ड्रिल मतमोजणीची माझी मागणी नव्हती. त्यातून माझे समाधान होणार नसल्याने मी त्यास नकार दिला," अशी माहिती सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.

आयोगाच्या नियमानुसार निकालानंतर फेरमतमोजणी नाही

- आयोगाच्या निकषानुसार मतमोजणी सुरू असताना, फेरमतमोजणी करता येते. एकदा निकाल जाहीर झाल्यावर फेर मतमोजणी किंवा फेरपडताळणीची मागणी ग्राह्य धरली जात नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

- फेरमतमोजणी केवळ मतमोजनीनंतर आणि निकाल लागण्याच्या आधीच करता येते. त्यासाठीही वेळेत आक्षेप नोंदवावा लागतो. त्यानंतर त्याच वेळेस फेरमतमोजणी घेण्यात येते आणि निकाल जाहीर केला जातो. 

- एकदा का निकाल जाहीर झाला की, केवळ मॉक ड्रिलच घेता येते, असे निवडणूक उप जिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले.


 

Web Title: uddhav Thackerays candidate demand for counting of EVM votes and vvpat slips But then different information came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.