नाशिकपासून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वाजणार निवडणुकांचा बिगुल
By admin | Published: December 23, 2016 12:14 AM2016-12-23T00:14:07+5:302016-12-23T00:14:23+5:30
पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन
नाशिक : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा शिवसेनेचा बिगूल नाशिकमधून वाजण्याची शक्यता आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी नाशिकला शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नवीन पंचायत समिती इमारत उद्घाटनासह ग्रामीण भागातील विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.येत्या सोमवारी (दि.२६) नाशिकला सकाळी ११ वाजता शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. नाशिक तालुका पंचायत समितीच्या कॉर्पोरेट दर्जाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येईल. तत्कालीन पंचायत समिती सभापती व विद्यमान उपसभापती अनिल ढिकले यांनी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम मंजुरीसाठी आमदार योगेश घोलप व माजीमंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांच्यासोबत शासन स्तरावर पाठपुरावा केला असून, आजमितीस इमारत अत्याधुनिक स्वरूपात सुसज्ज झाली आहे. त्यानंतर सिद्धप्रिंपी गावात उभारण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर सिडको भागातील काही विकासकामांचे व दहा नवीन शाखांचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभर विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रम घेणारे उद्धव ठाकरे त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत चर्चा करणार असल्याचे समजते. नाशिकच्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगूल वाजण्याची चिन्हे आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत २१ सदस्यांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, सत्ताधारी राष्ट्रवादी व भाजपासोबत सत्तेतही आहे. मुंबई महापालिकेत भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेना अनुकूल आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर पक्षाची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून नाशिकच्या दौऱ्यात सूतोवाच होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाशिकचा दौरा शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
(प्रतिनिधी)