उद्य सामंत यांच्याकडून विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी ; तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 01:17 PM2021-01-22T13:17:45+5:302021-01-22T13:25:20+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात होऊन या कामाला गती मिळावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि. २२) शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच उपकेंद्राच्या कामाला शासनाकडून मान्यता मिळाल्याचे संकेत देत उपकेंद्र व संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.
नाशिक : दीर्घकाळापासून रखडलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यानाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात होऊन या कामाला गती मिळावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि. २२) शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच उपकेंद्राच्या कामाला शासनाकडून मान्यता मिळाल्याचे संकेत देत उपकेंद्र व संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत.यावेळी विदयापीठाचे सचीव डॉ. प्रफुल्ल पवार, खासदार हेमंत गोडसे, सिनेट सदस्य अमित पाटील, नंदू पवार आदी उपस्थित होते.
शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्र लवकर सुरू करण्याबाबत उदय सामंत यांनी शुक्रवारी नाशिक दौऱ्यात चर्चा केली. नाशिक जिल्ह्यातील वेवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या कार्यरत असणाऱ्या उपकेंद्रास अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठासंदर्भात येणाऱ्या त्रुटींच्या पूर्ततेसाठी नाशिक ते पुणे असा प्रवास अनेक वेळा करावा लागतो. यामुळे वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होतो. या अगोदर देखील शिवनाई येथील उपकेंद्र कार्यान्वित करण्याबाबत अनेक आंदोलने झाली आहेत. यामुळे ते लवकर सुरू व्हावे, अशी सरकारची भूमिका असून अर्थसंकल्पात त्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. परंतु, तांत्रिक अडचणीं मुळे अद्याप उपकेंद्राचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी नाशिक दौऱ्यात विद्यापीठ उपकेंद्राच्या शिवनई येथील जागेची पाहणी करीत येथील समस्या जाणून घेतल्या. या जागेवरील अतिक्रमणाविषयी बोलतना सध्या उपकेंद्रासाठी १० हाजार चौरस फूटाचे काम सुरू करायचे आहे. त्यास सुरुवात करा अतिक्रमाणाचा या कामात अडथळा नसल्याने तो प्रश्न पुढे सोडविता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच नाशिककरांसाठी शिवनई येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आकार घेईल, अशी आशा नाशिकच्या शैक्षणिक वर्तुळात निर्माण झाली आहे..