इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅबला अखेर हिरवा कंदील
By admin | Published: September 30, 2015 11:51 PM2015-09-30T23:51:02+5:302015-09-30T23:51:52+5:30
नाशकातील उद्योजकांकडून स्वागत : नव्या गुंतवणुकीला संधी
नाशिक : केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थानने पश्चिम विभागीय केंद्रीय इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब शिलापूर येथे सुरू करण्यासाठी अखेरीस राज्य शासनाने नाशिक शहरानजीक शंभर एकर जागा देण्यास हिरवा कंदील दिला असून अनेक वर्षांपासूनचा हा प्रश्न सुटला आहे. यामुळे नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल क्लस्टर साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुमारे तीन ते चार वर्षांपूर्वीच नाशिकला इलेक्ट्रिकल क्लस्टर साकारावे यासाठी प्रयत्न सुरू होते. केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थान या संस्थेने पश्चिम विभागीय लॅब नाशिकला साकारण्याची तयारी केल्यानंतर त्यांना नाशिकमधील शिलापूर जवळील जागा दाखवण्यात आली आणि त्यांना ती पसंतही पडली; मात्र जागेचे हस्तांतरण अद्याप झालेले नव्हते. परंतु आता महसूल विभागाने शंभर एकर जागा हस्तांतरित करण्याच्या दिलेल्या निर्णयाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व प्रकल्पांना सर्व प्रकारच्या विद्युत संचांचे परीक्षण करणाऱ्या उद्योजकांना आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. राज्य शासनाने शंभर एकर जमीन नाममात्र दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास मान्यता दिल्याने मान्यता दिली आहे. राज्य शासन किंवा राज्य शासनाचे उपक्रम असलेल्या विद्युत कंपन्यांची उपकरणे, संयत्रे, संच आदिंची तपासणी, इतर सेवा तसेच अभियंत्यांना प्रशिक्षण देण्याच्या दरामध्ये २० टक्के कायमस्वरूपी सवलत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)