उमेदवारीसाठी इच्छुक कुंपणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:20 AM2017-07-28T00:20:44+5:302017-07-28T00:21:04+5:30

घमासान : नेत्यांना करावी लागणार कसरत

umaedavaaraisaathai-icachauka-kaunpanaavara | उमेदवारीसाठी इच्छुक कुंपणावर

उमेदवारीसाठी इच्छुक कुंपणावर

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनल आणि समाज विकास पॅनलमध्ये सरळ लढत होण्याची चिन्हे असून, दोन्ही बाजूने उमेदवारी मिळण्यावरून घमासान निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात प्रगती पॅनलकडून उमेदवारी न मिळाल्यास अनेक मातब्बरांनी समाज विकास पॅनलकडून उमेदवारी करण्याची तयारी केली आहे.
सत्ताधारी गटाने पॅनलचे नामकरण प्रगती केले असून, गुरुवारी (दि.२७) विरोधी गटाने पॅनलचे नामकरण समाज विकास ठेवले. दोन्ही पॅनलने त्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा माघारीच्या अंतिम दिवशी ३ आॅगस्टला करण्याचे जाहीर केले आहे. निफाडमध्ये आमदार अनिल कदम व माजी आमदार दिलीप बनकर यांच्याबरोबरच जिल्हा बॅँकेचे माजी संचालक माणिकराव बोरस्ते हे प्रगती पॅनलसाठी एकत्र आल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार अनिल कदम यांनी सत्ताधारी पॅनल विरोधात चूल मांडण्यासाठी मेळावा घेतल्याची चर्चा होती. गुरुवारी (दि.२७) प्रगती पॅनलच्या व्यासपीठावरून त्यांनी नीलिमा पवार यांची स्तुती करीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही आजी-माजी आमदारांचे समर्थक या निर्णयाने त्यांच्यासोबत कितपत राहतात, हा चर्चेचा विषय होता, तर काही माजी आमदारांनी आणि आजी-माजी लोकप्रतिनिधींनी पॅनलमध्ये वर्णी लागते की नाही, याची वाट पाहत ऐनवेळी उमेदवारी कापली जाण्याची शक्यता गृहीत धरून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिकडे गुरुवारी प्रगती पॅनलच्या व्यासपीठावर असलेल्या माजी अध्यक्ष अरविंद कोर यांनीही आपल्याला कोणी गृहीत धरू नये, असा इशारा दिल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. वक्तव्य जिव्हारी लागलेभाजपाचे नेते व आजी-माजी लोकप्रतिनिधी समाज विकास पॅनलच्या मदतीला धावत असतानाच शिक्षक परिषदेच्या निवडणुकीत भाजपाची उमेदवारी करणारे भाजपाचे नेते डॉ. प्रशांत पाटील हे प्रगती पॅनलच्या व्यासपीठावर अवतरल्याने तोही एक चर्चेचा विषय होता. प्रगती व समाज विकास पॅनलच्या नेत्यांनी अखेरच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यातच प्रगती पॅनलच्या भाषणात ‘ही राजकारणाची जागा नव्हे’ असे वक्तव्य पॅनलच्याच काही नेत्यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जाते. आजी-माजी लोकप्रतिनिधींना एकप्रकारे समाजाच्या संस्थेतून बाहेर जाण्याचाच हा इशारा असल्याचे या आजी-माजी लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही पॅनलकडून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडण्याची चिन्हे आहेत.

Web Title: umaedavaaraisaathai-icachauka-kaunpanaavara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.