सर्वसामान्यांना फटका! पेट्रोलच्या भडक्याने छत्री, रेनकोटवर महागाईचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 02:42 PM2022-06-01T14:42:20+5:302022-06-01T14:50:52+5:30
नाशिक - वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट, प्लास्टिक, आदी पावसाळी साहित्य खरेदीसाठी नाशिककरांची पावले बाजारपेठेकडे वळू ...
नाशिक - वातावरणातील बदलामुळे मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे छत्री, रेनकोट, प्लास्टिक, आदी पावसाळी साहित्य खरेदीसाठी नाशिककरांची पावले बाजारपेठेकडे वळू लागली आहेत. मात्र, गत वर्षीच्या तुलनेत किमतीत २५ टक्के वाढ झाल्याने पावसापासून संरक्षण करणाऱ्या या वस्तू सामान्यांना महागाईचे चटके देत आहेत. या वस्तूंसाठी लागणारे पॉलिस्टर कापड पेट्रोलियम संबधित उत्पादन आहे. गत वर्षभरात पेट्रोलच्या किमतीचा भडका आणि वाहतूक खर्चातील वाढीमुळे पॉलिस्टर महागले आहे. त्यातच या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागल्याने आयातीवर देखील परिणाम झाला आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीला पावसाळी खरेदीला सुरुवात होते. त्यामुळे व्यावसायिकही उन्हाळी उत्पादने बाजूला करून छत्री, रेनकोट, जुन्या घरांच्या छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक ताडपत्री, पावसाळी चप्पल अशा विविध वस्तू पुढे आणतात. महामारी काळात गत दोन वर्षे या बाजारात काहीसी मंदी होती. यंदा मात्र २० ते २५ टक्क्यांनी किमती वाढून महागाईचा भडका उडाला आहे.
विशेषता छत्र्यांचे दर २५ टक्के महागल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. छत्रीसाठी पॉलिस्टर कापड लागते. हे कापड पेट्रोलियम उत्पादनांशी संबंधित आहे. गत दीड-दोन वर्षांत पेट्रोलचे दर प्रतिलिटर तब्बल ३० ते ४० रुपये महागले आहे. त्याचा परिणाम साहजिकच संबंधित वस्तूंवर देखील झाला आहे. त्यातच स्टीलचे दर वाढल्याने छत्रीसाठी लागणाऱ्या काड्यांच्या खर्चात देखील भर पडली आहे. वाहतूक आणि कर्मचाऱ्यांचा खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. कच्च्या मालापासून ते कामगारांपर्यंतचा खर्च वाढल्याने छत्री बाजाराला महागाईच्या झळा बसत आहेत. नाशिकच्या बाजारपेठेत स्थानिक व त्याचबरोबर मुंबई, उल्हासनगर, लुधियाना या ठिकाणांहून छत्र्यांची आवक होते. छत्रीबरोबरच रेनकोटवरचे दरही २० टक्क्यांहून महागले आहेत. रेनकोटच्या कच्चा मालाची महागाई आणि वाहतूक खर्च वाढल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यावसायिक सांगतात.
छत्र्यांचे दर
मागील वर्षीचे दर यंदाचे दर
पारंपरिक छत्री २०० ते २५० २५० त ३००
फोल्डिंग छत्री २५० ३००
बेबी अम्बेला १२० ते १५० २०० ते २५०
गार्डन अम्बेला ७०० ते २००० १००० ते २०००
चीनमधील लॉकडाऊनमुळे नाविन्यतेला ब्रेक
छत्री, रेनकोट व प्लास्टिक सीटचे सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होते. भारतीय उत्पादनांच्या तुलनेत चिनी वस्तू ग्राहकांचे लक्ष पटकन वेधून घेतात. तसेच चीन वस्तूंमध्ये दरवर्षी नावीन्य असते. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चीनच्या अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लागले आहे. त्यामुळे आयातीवर परिणाम झाला असून, परिणामी छत्री आणि रेनकोटच्या बाजारात यंदा फारसे नावीन्य नसल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.
पावसाळा तोंडावर असल्याने जुन्या घरांच्या छतावर टाकण्यासाठी प्लास्टिक आणि ताडपत्री सीटची मागणी वाढली आहे. प्लास्टिकदेखील पेट्रोलियम संबंधित उत्पादन असल्याने गत वर्षीच्या तुलनेत ते ३० टक्के महागले आहे. प्रतिकिलो, चौरस मीटर आणि सीटनुसार त्याची विक्री होते.
- भरत पाटील, ताडपत्री व्यावसायिक
नागरिकांसह छोट्या-मोठ्या दुकानदारांकडून मागणी सुरू झाली आहे. मात्र, दरात २० ते २५ टक्के वाढ झाल्याने एकाच वेळी बुकिंग करण्यापेक्षा व्यावसायिक टप्प्याटप्प्याने बुकिंग करत आहे. ग्रामीण भागात १२ व १६ काडी पारंपरिक छत्रीला, तर शहरी भागात फोल्डिंगच्या आणि बेबी अम्बेलाला पंसती मिळत आहे.
- रमेश छत्रीशा, छत्री व्यवसायिक