नाशिक बाजार समितीच्या सभापतिपदी सकाळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 08:01 PM2020-03-11T20:01:04+5:302020-03-11T20:01:52+5:30
मागील वर्षापासून बाजार समितीत वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळेंना राजकीय धक्का देत दोन संचालकांच्या बळावर शिवाजी चुंभळे यांनी सभापतिपद काबीज केल्याने बाजार समितीचे राजकारण तापून
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून रंगलेल्या राजकारणाचा समारोप बिनविरोध सभापती निवडीत झाला. बुधवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत संपतराव सकाळे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील वर्षापासून बाजार समितीत वर्चस्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळेंना राजकीय धक्का देत दोन संचालकांच्या बळावर शिवाजी चुंभळे यांनी सभापतिपद काबीज केल्याने बाजार समितीचे राजकारण तापून चुंबळे विरुद्ध पिंगळे असा सामना रंगला होता. त्यातून पिंगळे यांच्या विरोधात व चुंभळे यांच्याही विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकमेकांवर कुरघोडीच्या राजकारणात चुंभळे यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी अविश्वास ठरावही मंजूर करण्यात येऊन त्यांना पायउतार करण्यात आले होते. त्यामुळे नवीन सभापती निवडीसाठी बुधवारी संचालकांची विशेष बैठक बोलाविण्यात आली. त्यात संपतराव सकाळेंचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बाजार समिती सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काम पाहिले.
संपतराव सकाळे यांच्या निवडीची घोषणा होताच, त्यांच्या समर्थकांनी बाजार समितीत जल्लोष साजरा केला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत येत्या आॅगस्ट महिन्यात संपुष्टात येत असून, नवीन सभापतींना अवघ्या चार महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.