अतिक्रमित वस्तीवरील कारवाई बेकायदेशीर
By admin | Published: September 8, 2015 11:23 PM2015-09-08T23:23:08+5:302015-09-08T23:23:33+5:30
मनमाड : दिशा महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप
मनमाड : येथील बसस्थानकाशेजारील अतिक्रमित वेश्यावस्ती पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केल्याची कार्यवाही बेकायदेशीर असल्याचा आरोप दिशा महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करून या अन्यायाविरोधात राज्यभरातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त वस्तीमध्येच आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर -पुणे महामार्गावर बसस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. पोलीस पथकाने चार दिवसांपूर्वी या वस्तीवर धाड टाकून दोन पुरुष व सहा महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील ३२ पीडित महिलांची नाशिकला रवानगी करण्यात आली आहे. सदरची वेश्यावस्ती रिकामी झाल्याने पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले.
सदरची कारवाई करताना रहिवाशांना कुठलीही पूर्वसूचना व नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत तसेच नियम व कायदे धाब्यावर
बसवून सदर वस्तीत धाड टाकण्यात आली असल्याचा आरोप स्वास्ती हेल्थ रिसोर्स सेंटरच्या पदाधिकारी सीमा शिंदे, दिशा महिला संघटनेच्या अध्यक्ष परवीन शेख व अन्य पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या महिलांच्या उद्ध्वस्त घरांच्या ढिगाऱ्याखाली गृहोपयोगी सामान तसेच महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे व दागदागिने, पैसे दाबले गेले आहे. पुढील कार्यवाहीसाठी या महिलांना ओळखपत्राची आवश्यकता असली तरी ते मिळणे मुश्कील झाले आहे. या महिलांना याच वस्तीत घरे बांधून मिळावी, तसेच नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कंपाउंडच्या कामाबाबत स्टे आॅर्डर तसेच अन्यायाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे सीमा शिंदे यांनी सांिगतले. यावेळी दिशा संस्थेचे रजिया पठाण, लता कापसे, लहू गोमसाळे, संदीप अहिरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)