अनधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:15 AM2021-01-03T04:15:32+5:302021-01-03T04:15:32+5:30
रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव नाशिक : शहरातील जुने नाशिक परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या झुंडी ...
रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उपद्रव
नाशिक : शहरातील जुने नाशिक परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरिकांना रात्री त्या भागातून जाताना भीती वाटते. सकाळच्या सुमारास मॉर्निग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. अनेकांना तर मार्गदेखील बदलावा लागतो. रस्त्यावर टाकलेले शिळे अन्न यामुळे कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला आहे.
उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
नाशिक: शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. यंदा कोरोनामुळे उद्यानांचे काम हाती घेण्यात आले नसल्याने वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कोरोना कमी झाल्यानंतर ज्या बालक आणि पालकांना उद्यानात जायचे असेल तर त्यांना या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
मोकाट जनावरांचा भर रस्त्यात ठिय्या
नाशिक : शहरातील अनेक भागांत सध्या मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारे गुरे तसेच श्वानांचा संचार वाढला आहे. रस्त्याने फिरणाऱ्या या जनावरांमुळे वाहतुकीला आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या गुरांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर दिसून येतात, तर कधी रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गुरांमुळे वाहतुकीचा खोळंबा होताे. तसेच कधी अपघातांच्या घटनादेखील घडतात.
थुंकणाऱ्यांवर कारावाई
करण्याची मागणी
नाशिक : कोविडच्या काळात रस्त्यावर थुंकणाऱ्यामुळे संसर्ग पसरण्याची भीती असल्याने अशा व्यक्तींविरुद्ध कारवाई कारवाई होतांना दिसत नाही. सध्या नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, कोणीही नियमांचे पालन करण्याच्या मानसिकतेत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शिंगाडा तलाव परिसराला पुन्हा वाहनांचा गराडा
नाशिक : शिंगाडा तलाव परिसरातील रस्त्यावर नागरिकांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहने उभी करून ठेवली जातात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. बरेचदा वादावादीचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे या रस्त्यांवरील या अनधिकृत वाहनतळांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
जुन्या वाहनांनी व्यापला रस्ते
नाशिक : पंचवटीतील आडगाव नाका तसेच द्वारका ते मुंबईनाका परिसर जुन्या वाहनांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानासमोर मोठ्या प्रमानात जुनाट वाहने उभी असतात. या वाहनांनी रस्ता व्यापला जात असल्याने परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अडचण होत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मोबाइल अतिवापराने नेत्रविकाराची भीती
नाशिक : कोरोनामुळे अद्यापही शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थी मोबाइल, टॅब, लॅपटॉपच्या मदतीने शिक्षण घेत आहेत. परंतु, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढला असून, त्यांना नेत्रविकार जडण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. किंबहुना अनेकांना डॉक्टरांकडे जाण्याचीदेखील वेळ आली आहे.