विनापरवाना व्यवसाय : नगररचना विभागाकडून सर्वेक्षण, कारवाई शून्य टेरेस रेस्टॉरंटवर पालिकेची मेहेरनजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:56 AM2017-12-30T00:56:03+5:302017-12-30T00:56:50+5:30

नाशिक : मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील हॉटेल मोजोसच्या टेरेसवर असलेल्या पबला भीषण आग लागून १४ जण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Unauthorized business: Survey by municipal corporation, action takes place on Zero Terrace Restaurant | विनापरवाना व्यवसाय : नगररचना विभागाकडून सर्वेक्षण, कारवाई शून्य टेरेस रेस्टॉरंटवर पालिकेची मेहेरनजर

विनापरवाना व्यवसाय : नगररचना विभागाकडून सर्वेक्षण, कारवाई शून्य टेरेस रेस्टॉरंटवर पालिकेची मेहेरनजर

Next

नाशिक : मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील हॉटेल मोजोसच्या टेरेसवर असलेल्या पबला भीषण आग लागून १४ जण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशिकमधील टेरेस रेस्टॉरंटचीही सुरक्षा चर्चेत आली आहे. शहरात महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात विनापरवाना चालणारे सुमारे ३५ च्या आसपास टेरेस रेस्टॉरंट आढळून आले. परंतु, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी मेहेरनजरच पालिकेने दाखविल्याचे चित्र दिसून येते. हॉटेल्स-रेस्टॉरंटने एकदा घेतलेल्या परवान्याच्या नूतनीकरणाची व्यवस्था एका परिपत्रकामुळे रद्द करण्यात आल्याने अग्निशामक दलाचेही अशा टेरेस रेस्टॉरंटवर नियंत्रण राहिलेले नाही.
मुंबईतील लोअर परेलमधील ट्रेड हाउस इमारतीच्या टेरेसवर थाटण्यात आलेल्या पबला भीषण आग लागून १४ जणांचा बळी जाण्याची घटना शुक्रवारी (दि.२९)घडली. टेरेस रेस्टॉरंटमध्ये केवळ खानपानाचा परवाना असतानाही अनेक ठिकाणी तेथेच बेकायदेशिरपणे किचन थाटले जाते शिवाय, हुक्का पार्लर खुलेआम चालविले जाते. नाशिक शहरातही टेरेसचा रेस्टॉरंट म्हणून वापर वाढला आहे. प्रामुख्याने, कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड या परिसरात मोठ्या प्रमाणावर टेरेस रेस्टॉरंट चालविली जात आहेत. याशिवाय, शहरातील काही तारांकित हॉटेल्सनेही बिनधास्तपणे टेरेसवर डोम टाकत बेकायेशीरपणे रेस्टॉरंट थाटलेले आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाने काही महिन्यांपूर्वी शहरातील टेरेस हॉटेल-रेस्टॉरंटसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ३५च्या आसपास रेस्टॉरंट आढळून आले होते.
नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू
महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आकाश बागुल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी महापालिकेने अशा टेरेस रेस्टॉरंटचा सर्व्हे करण्यात आल्याचे आणि संबंधितांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. मात्र, महापालिकेला सर्वेक्षणात आढळून आलेल्या सुमारे ३५ रेस्टॉरंटला अद्याप नोटिसा बजावण्यात आल्या नसल्याचे वास्तव आहे. नगररचना विभागाकडून संबंधित व्यावसायिकांना विनापरवाना व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी नोटिसा बजावून त्यांचे अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही होणे अपेक्षित आहे. परंतु, तशी कोणतीही कृती होताना दिसून येत नाही.
परिपत्रकामुळे नूतनीकरण नाही
३० आॅक्टोबर २०१४ रोजी राज्याच्या अग्निशमन सेवा संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, एकदा अग्निशमनचा परवाना घेतल्यानंतर पुन्हा नूतनीकरणाची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीत २०१६ पासून नूतनीकरणाची प्रक्रिया बंद झालेली आहे. यापूर्वी दरवर्षी होणाºया नूतनीकरणामुळे हॉटेल्स-रेस्टॉरंटची पाहणी होत असे. परंतु, या परिपत्रकामुळे आता अग्निशमन विभागाचेही नियंत्रण सुटले आहे. शहरात काही टेरेस रेस्टॉरंट आहेत, त्याठिकाणी किचन थाटण्यात आलेले आहेत. वर टेरेसवरच गॅस सिलिंडरचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याचे नुकसान संपूर्ण इमारतीलाच पोहोचू शकते. दरम्यान, गेल्या वर्षभरात एकही प्रकरण परवानगी आले नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन यांनी सांगितले. सर्वेक्षणानंतर संबंधितांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही मात्र झालेली नाही. त्यामुळे अशा रेस्टॉरंटवर पालिकेची मेहेरनजर असल्याने त्याठिकाणी खुलेआम विनापरवाना व्यवसाय सुरू आहे. अशा ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही केलेली नसल्याचेही निदर्शनास आले आहे. महापालिकेकडे गेल्या दोन वर्षांत टेरेस रेस्टॉरंटसंदर्भात आगप्रतिबंधक परवाना घेण्यासाठी एकही प्रकरण आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडेही नगररचना विभागाकडून कारवाईसंदर्भात सूचना नाही. मुंबईत टेरेसवरील पबमध्ये घडलेली घटना कुठेही घडू शकते. त्यामुळे नाशिकमध्येही टेरेसवरील रेस्टॉरंटसंबंधी महापालिकेकडून आता कारवाईबाबत कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागून असणार आहे.

Web Title: Unauthorized business: Survey by municipal corporation, action takes place on Zero Terrace Restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल