नाशिकच्या भारतनगर, वडाळागाव परिसरात अनधिकृत नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:17 PM2018-02-26T15:17:31+5:302018-02-26T15:18:03+5:30
अनधिकृत नळजोडणी असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्रासचोरी
नाशिक - भारतनगर,मेहबूबनगर, मुमताजनगर व अण्णा भाऊ साठे नगर यासह परिसरात मोठ्या प्रमाण अनधिकृत नळजोडणी असल्याने लाखो लिटर पाण्याची सर्रासचोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीपट्टीचा लाखो रु पयांचा महसूल बुडत आहे. भारतनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, सादिकनगर, अण्णाभाऊ साठेनगर आदी परिसरात हातावर काम करणाºयांची लोकवस्ती म्हणून ओळख आहे तर काहींनी गुंठे वार पद्धतीने जागा घेऊन घरे बांधली आहेत. हजारोंच्या संख्येने लोकवस्ती असून त्यापैकी बहुतेकांनी अनधिकृतपणे नळ जोडणी करून घेतली आहे. सुमारे पाच ते सहा वर्षांपासून अनधिकृतपणे नळ जोडणी करून घेताना त्यांना कोणत्याही प्रकारची पाणीपट्टी येत नाही. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची सर्रासपणे चोरी होत असून पाणीपट्टीतून मिळणारा महसुल लाखो रु पयांनी बुडत आहे. महापालिकेने अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी ४५ दिवसांची अभय योजना राबवली होती. मात्र या योजनेला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे सदर योजनेअंतर्गत नागरिकांना अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी शेवटची संधी म्हणून २० डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतरही अद्यापर्यंत परिसरातील अनधिकृत नळजोडणी अधिकृत करून घेण्यासाठी नागरिकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे दिसून येत आहे. शेकडोच्या संख्येने असलेल्या अनधिकृत नळजोडणी धारकांवर कारवाई केव्हा होणार आणि लाखो लिटर पाण्याची व पाणीपट्टी महसुलाची बचत केंव्हा होणार असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.