भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:39 AM2019-05-28T00:39:06+5:302019-05-28T00:39:23+5:30
वडाळागावातील महेबूबनगरसह परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणीमुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे
इंदिरानगर : वडाळागावातील महेबूबनगरसह परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणीमुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तरीही महावितरण कंपनी ठोस पाऊल उचलत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
वडाळागाव व परिसरात हातावर काम करणाऱ्यांची लोकवस्ती दिवसागणिक वाढत चालली आहे. यामध्ये मेहबूबनगर, गुलशननगर, सादिकनगर, मुमताजनगर याच परिसरात लोकवस्ती अधिक वाढत आहे. त्याचबरोबर परिसरात अनधिकृत भंगार गुदामही वाढत आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी तीन ते चार भंगार गुदामे होती. आज त्यांची संख्या सुमारे ४०च्या घरात गेली आहे.
या अनधिकृत भंगार गुदाममध्ये शहरातून गोळा केलेले प्लॅस्टिक वितळणे, पत्रे लोखंडी कटिंग करणे यासह विविध कामासाठी विद्युत पुरवठा लागतो. परंतु काही भंगार गुदाम मालकांनी जसे अनधिकृत भंगार गुदामे आहेत तसेच अनधिकृतपणे जमिनीखालून विद्युत पुरवठा घेतला आहे. त्यामुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत असून, त्यामुळे लाखो रुपयांचे वीज बिल मिळत नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
नागरिकांमध्ये संताप
सुमारे वीस दिवसांपूर्वी महावितरणच्या भरारी पथकाने दोन भंगार गुदाममालकांवर अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला तसेच लाखो रु पयांचा दंड केला. महावितरण कंपनीचे भरारी पथक कारवाई करतील, परंतु परिसरातील महावितरण कंपनीचे कक्ष कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बघायची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.