अनधिकृत धार्मिक स्थळे; आजपासून कारवाई

By admin | Published: November 8, 2016 12:55 AM2016-11-08T00:55:35+5:302016-11-08T00:51:49+5:30

महापालिकेचे नियोजन : सिडकोतून मोहिमेस होणार प्रारंभ

Unauthorized religious sites; Action from today | अनधिकृत धार्मिक स्थळे; आजपासून कारवाई

अनधिकृत धार्मिक स्थळे; आजपासून कारवाई

Next

नाशिक : उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई मंगळवार (दि.८) पासून होत असून, त्याची सुरुवात सिडकोपासून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांवर अडथळा ठरणारी ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार महापाालिकेला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई पूर्ण करावयाची आहे. २९ सप्टेंबर २००९ नंतरची शहरात सार्वजनिक जागेत २४५ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. त्यातील २१४ महापालिकेच्या जागांवर, तर ३१ स्थळे सिडकोच्या जागेत आहेत. न्यायालय आणि राज्य शासनामार्फत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे वारंवार निर्देश दिले जात असल्याने महापालिकेने त्याबाबतचे नियोजन आता पूर्ण केले आहे. सोमवारी पोलीस आयुक्तालय, सिडको आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बैठक घेतली आणि कारवाईच्या नियोजनाचा आढावा घेत कालबद्ध कार्यक्रमाची आखणी केली. नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात रस्त्यात अडथळा ठरणारी ८४ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात मंगळवार (दि.८) पासून सिडको विभागातून करण्यात येणार आहे. सिडकोतील चार अनधिकृत धार्मिक स्थळांचा समावेश आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाई करण्यासाठी पोलिसांकडेही बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी दिलेल्या मुदतीत कारवाई न केल्यास महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात न्यायालयाचा कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाईची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)
२२३ धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव
२९ सप्टेंबर २००९ पूर्वीची ६६९ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. मात्र, त्यासाठी तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात नियमितीकरण करायचे आहे, तर दुसऱ्या टप्प्यात जे नियमित होऊ शकत नाहीत त्यांना हटवायचे आहे. जे नियमित होऊ शकत नाही, परंतु संबंधितांनी ते खासगी जागेत स्थलांतरित करण्याचे ठरविल्यास त्यांना परवानगी दिली जाणार आहे. ६६९ पैकी २२३ धार्मिक स्थळे ही १९६० पूर्वीची आहेत. या धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणाचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. पाडण्यात येणाऱ्या ४२६ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी दोन-तीन दिवसांत प्रसिद्ध केली जाणार असून, अद्याप एकही प्रस्ताव स्थलांतरणासाठी आला नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Web Title: Unauthorized religious sites; Action from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.