पिंगळे यांच्या विरुद्ध अविश्वास
By admin | Published: June 24, 2017 01:01 AM2017-06-24T01:01:43+5:302017-06-24T01:01:56+5:30
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर गैरव्यवहार व मनमानी कारभाराचा ठपका ठेवत बाजार समितीच्या अठरा पैकी तेरा सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्यावर गैरव्यवहार व मनमानी कारभाराचा ठपका ठेवत बाजार समितीच्या अठरा पैकी तेरा सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला असून, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव सादर केला आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये पिंगळे यांच्या गटातून निवडून आलेल्या संचालकांनीच त्यांच्याविरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
गेल्या आठवड्यापासून पिंगळे यांच्या विरोधात विरोधकांनी जमवाजमव सुरू केली होती. गुरुवारीच जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली होती. तथापि, पिंगळे यांनी स्वत:हून सभापतिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने ही मोहीम थांबली होती. शुक्रवारी मात्र तेराही संचालकांनी आपल्या समर्थकांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास ठराव दाखल केला व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमानुसार बाजार समितीची विशेष सभा बोलविण्याची विनंती केली आहे. अविश्वास ठराव दाखल करण्यामागे या संचालकांची कारणे दिली असून, त्यात म्हटले आहे की, सभापती पिंगळे यांनी सुरुवातीपासूनच बाजार समितीत मनमानी कारभार चालविला असून, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता निधीचे सुमारे ५३ लाख रुपये त्यांनी परस्पर हडप केल्याच्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे तसेच न्यायालयाने त्यांना बाजार समितीच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून रोखल्यामुळे बाजार समितीची तसेच संचालकांची बदनामी झाली आहे. समितीच्या सभेमध्ये चर्चा न झालेल्या विषयांचे ठराव घुसविण्याचे तसेच विषय पत्रिकेत नसलेल्या विषयांना मान्यता देण्याचे प्रकारही त्यांच्याकडून घडले आहेत. या ठरावावर शिवाजी चुंभळे, तुकाराम पेखळे, संपत सकाळे, युवराज कोठुळे, विमलबाई जुंद्रे, विश्वास नागरे, संजय तुंगार, रवींद्र भोये, श्यामराव गावित, भाऊसाहेब खांडबहाले, जगदिश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम या तेरा संचालकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचा ठराव दाखल करून घेतला असून, त्यांच्या समक्ष पुन्हा सर्व संचालकांना स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले.
४४ कोटींचे नुकसान
बाजार समितीच्या पैशातून शेतकरी हिताचे निर्णय न घेता स्वत:ची जाहिरातबाजी पिंगळे यांनी केली असून, राज्य सहकारी बॅँकेच्या सामोपचार परतफेडी योजनेत पैसे न भरल्याने पिंगळे यांनी बाजार समितीचे ४४ कोटींचे नुकसान केल्याचेही या पत्रात म्हटले आहे. या सर्व घटनांमुळे सभापती पिंगळे यांच्यावर विश्वास राहिला नसल्याने त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव व्यक्त करण्यासाठी विशेष सभा बोलविण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.