अंबोडे ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार,
By Admin | Published: February 21, 2015 12:59 AM2015-02-21T00:59:19+5:302015-02-21T00:59:54+5:30
माजी सभापतीचा आरोप कुटुंबातच घेतला आर्थिक लाभ : मंदाकिनी भोये
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील अंबोडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच योगिराज पवार व ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या पत्नी मीनाक्षी योगिराज पवार यांनी १३व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असून, या निधीचे स्वत:च्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावे धनादेश काढले असल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला सील ठोकून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा इशारा सुरगाणा पंचायत समिती सदस्य व माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी दिला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मंदाकिनी भोये यांनी म्हटले आहे की, आंबोडे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच योगिराज पवार, त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षी पवार यांनी ग्रामनिधी व १३व्या वित्त आयोग खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला असून, लाखो रुपयांच्या रक्कमा सुनील इंटरप्रायझेस (त्यांचा मुलगा) योगेश ट्रेडर्स (त्यांच्या स्वत:चे नावे) चिंतामण लक्ष्मण पवार (वडिलांचे नावे) युवराज चौधरी (त्यांचे वाहनचालक) नावे वर्ग करण्यात आल्या आहेत. सरपंचपदाचा गैरवापर करून आपल्या कुटुंबीयांचा आर्थिक फायदा केल्याने त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १४ ग व १६ अन्वये कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा आर्थिक फायदा करून देणे, हा गुन्हा आहे. या ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे विभागीय चौकशी अहवालात सिद्ध झाले असून, तसा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात २३ जून २०१४ रोजीच प्राप्त झाला आहे. तरीही दोषींवर कारवाई होत नसल्याने याबाबत २३ फेबुवारीपर्यंत दोषींवर कारवाई होऊन फौजदारी खटले दाखल न केल्यास आपण ग्रामपंचायत कार्यालयास सील ठोकून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू, असा इशारा पंचायत समिती सदस्य मंदाकिनी भोये यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)