महिलांचे सौभाग्याचं लेणं असुरक्षित; सोनसाखळी चोरीचा सिलसिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 02:32 PM2020-02-25T14:32:31+5:302020-02-25T14:38:32+5:30
‘सोनसाखळी चोर पकडा अन् थेट क्राईम ब्रान्चमध्ये पोस्टिंग मिळवा, तसेच ५१ हजाराचे बक्षीसही घ्या’ अशी मेगा आॅफरही पोलीस आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक : शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचा सिलसिला थांबता थांबत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. अंबड, म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे ६५ हजारांचे सोने लुटल्याचे समोर आले आहे.
‘सोनसाखळी चोर पकडा अन् थेट क्राईम ब्रान्चमध्ये पोस्टिंग मिळवा, तसेच ५१ हजाराचे बक्षीसही घ्या’ अशी मेगा आॅफरही पोलीस आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे, तरीही पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यास अद्याप यश येत नसल्याचे चित्र आहे. शहर गुन्हे शाखांच्या युनीट-१ व२ तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेला सोनसाखळी चोरांच्या मुसक्या बांधण्यात अलिकडे फारसे यश येऊ शकलेले नाही. सोनसाखळी चोरीची दर दिवसाआड एक तरी घटना शहरात कुठल्या तरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याशिवाय राहत नाही. सर्वाधिक घटना इंदिरानगर, म्हसरूळ, मुंबईनाका, पंचवटी या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच घडल्या आहेत. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार सोनसाखळी चोरीच्या घडणाऱ्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
म्हसरूळ शिवारातील स्नेहनगर येथून रस्त्याने पायी जाणाºया महिलेच्या गळ्यातील तीस हजार रु पये किमतीची १०ग्रॅमची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने रात्री नऊ वाजेच्या सुमारास ओरबाडून पळ काढला. याप्रकरणी नितीन वसंत जाधव यांनी तक्र ार दाखल केली आहे .त्यांच्या आई वत्सला व बडोदा येथे राहणाºया मावशी मंगला रामचंद्र खैरनार या दोघी बाहेर खरेदीसाठी गेल्या होत्या. खरेदी करून त्या घराकडे पायी परतत असताना ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पहिल्या घटनेत अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको पाटीलनगर भागात वर्षा सतीष खैरनार (४०) या मनपा मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळून त्यांच्या मुलीसोबत जात असताना अज्ञात एका दुचाकीस्वार इसमाने त्यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.
दुस-या घटनेत सोमवारी (दि.२४) खैरनार पाटीलनगर येथील नव्या मनपा मैदानावर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फिरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी प्रवेशद्वाराजवळून त्या जात असताना त्यांच्या समोरून एक अनोळखी इसम काळ्या रंगाच्या दुचाकीवरून भरधाव येत गळ्यावर हात मारून त्यांच्या गळ्यातील सुमारे ३३ हजार रूपये किंमतीची ११ग्रॅम वजनाची सोनसाखळी ओढून पसार झाला. या दोन्ही घटनांमध्ये किमान १२ तासांचे अंतर आहे.