तुकाराम मुंढेंच्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाबाबत अनिश्चितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:50 PM2018-04-26T18:50:26+5:302018-04-26T18:50:26+5:30
मुंढे जाणार रजेवर : प्रशासनाकडून मात्र तयारी सुरू
नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे पंधरा दिवसांसाठी रजेवर जाणार असल्याने येत्या शनिवारी (दि.२८) होणाऱ्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शुक्रवारी (दि.२७) पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू असताना आयुक्त कार्यालयाकडून मात्र, वॉक विथ कमिशनर हा उपक्रम होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आयुक्तांच्या रजा कालावधीत होणा-या या उपक्रमाबाबत संभ्रमावस्था आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इंच न् इंच जमिनीवर कर लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे तिव्र पडसाद उमटत आहेत. गेल्या सोमवारी (दि.२३) करवाढीविरोधात नाशिककरांसह शेतक-यांनी रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला तर महापालिकेच्या विशेष महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी करवाढीला कडाडून विरोध दर्शविल्यानंतर महापौरांनी मुंढेंच्या निर्णयाला स्थगिती दिली. शहरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असतानाच तुकाराम मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार असल्याची बातमी आली. मुंढे यांची दि. २ ते ११ मे या कालावधीसाठी रजा मंजूर झालेली असून ते युरोपला खासगी दौ-यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेला चौथा शनिवार (दि.२८), रविवार (दि.२९), सोमवारी बुद्धपौर्णिमा (दि.३०) आणि मंगळवारी महाराष्ट दिन(दि.१ मे) अशी सलग चार दिवस सुट्टी आहे. त्यामुळे जिल्हाधिका-यांकडून शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी मुंढे यांच्याकडून पदभार स्वीकारला जाणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास, येत्या शनिवारी (दि.२८) गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम होणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आयुक्त कार्यालयाकडून मात्र, उपक्रम होणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पदभार सुपुर्द केल्यानंतर रजा कालावधीत आयुक्तांना असा उपक्रम घेता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. मागील शनिवारी कौटुंबिक कारणास्तव आयुक्त मुंढे यांना सदरचा उपक्रम पुढे ढकलावा लागला होता. आता त्याची सुरुवात शनिवारी अपेक्षित असताना आयुक्त रजेवर जाणार असल्याने उपक्रमाचा मुहुर्त लागण्यास अडचण निर्माण झाली आहे.
बंगल्यावर बंदुकधारी सुरक्षारक्षक
करवाढीविरोधी शहरात तिव्र असंतोष प्रकट केला जात असतानाच आयुक्तांविरुद्धही रोष व्यक्त होत आहे. या साºया पार्श्वभूमीवर महापालिकेत महाराष्ट सुरक्षा मंडळाचे नियुक्त करण्यात आलेले शस्त्रधारी सुरक्षारक्षक आयुक्तांच्या शासकीय बंगल्यावर तैनात करण्यात आले आहेत. महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेले बंदुकधारी काढून घेत ते बंगल्यावर पाठविण्यात आले असून तीन सत्रात ७ बंदूकधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.