त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 11:20 PM2022-06-27T23:20:12+5:302022-06-27T23:20:39+5:30
त्र्यंबकेश्वर : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातून भाविक दर्शनाकरिता येतात, मात्र येणारा प्रत्येक भाविक,पर्यटक येथील ...
त्र्यंबकेश्वर : भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात देश-विदेशातून भाविक दर्शनाकरिता येतात, मात्र येणारा प्रत्येक भाविक,पर्यटक येथील अस्वच्छता, घाण व परिसरातील दुर्गंधीमुळे नाराजी व्यक्त करीत आहे.
त्र्यंबकेश्वर शहरात प्रवेश करताना सुरुवात केर-कचरा,प्लास्टिकच्या बाटल्या गुटख्याच्या पुड्या आदी रस्त्याच्या दुतर्फा पहायला मिळतात. शिवाय कुशावर्तातील पाणी अतिशय घाण व दुर्गंधीयुक्त असल्याने व कुशावर्त परिसरात यात्रेकरुंचे कपडे, फूले, चपला, पूजा साहित्य पायदळी पडल्याने संपूर्ण परिसर घाण असल्याबद्दल यात्रेकरुंनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान श्रावण महिना व भाविकांची गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्ताकरीता आणलेले लोखंडी बॅरीकेटस् देखिल त्र्यबकेश्वर शहरातील काही महत्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आले होते ते अद्याप काही भागात रस्त्याच्या दूतर्फा भग्नावस्थेत पडल्याचे दृष्य सर्वत्र दिसत आहे. याकडे पोलिस यंत्रणेनेही कानाडोळा केला आहे.
त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छतागृहाची कमतरता असून कुशावर्ताजवळील स्वच्छतागृह घाणीचे आगर झालेले पहावयास मिळते. येथे. पाणी नसल्याने परीसरात लांबवर दुर्गंधी पसरलेली असते. याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन फारसे लक्ष देत नसल्याने व स्वच्छतेच्या कामाचा ठेका घेणाऱ्यांकडून समाधानकारक काम होत नसल्याची ओरड तेथील रहिवासी ओरडू लागले आहे.