प्रभाग १९ मधून काँग्रेसच्या किशोरीबानो बिनविरोध
By admin | Published: May 12, 2017 02:21 AM2017-05-12T02:21:25+5:302017-05-12T02:23:21+5:30
आझादनगर : महापालिका निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी गुरुवारी प्रभाग क्रमांक १९ क मधून काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आझादनगर : महापालिका निवडणुकीत माघारीच्या अंतिम दिवशी आज गुरुवारी प्रभाग क्रमांक १९ क मधून राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमसह अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. महानगरपालिकेत काँग्रेसने आपले खाते उघडल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएमवर कार्यकर्त्यांच्या नाराजीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. प्रभाग क्र. १९ क हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता. यात अर्ज छाननीनंतर चार महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी खरी लढत काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेहराजबी रशीद यांच्यात होणार होती. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी विरोधातील सर्व उमेदवारांची मने वळविण्यात काँग्रेस समर्थकांना यश आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बेग मेहराजबी रशीद, एमआयएमच्या सय्यद शाहेदाबानो अशपाक व अपक्ष शहेनाजबी शेख खलील यांनी माघार घेतल्याने किशोरीबानो बिनविरोध निवडून आल्या आहेत.