सरपंचांनी आईच्या मायेने काम करावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:12 PM2018-01-17T23:12:45+5:302018-01-17T23:16:04+5:30
भास्करदादा पेरे : सरपंच अवॉर्ड सोहळ्यात सरपंचांना मार्गदर्शन नाशिक : सरपंचांना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त कामाचे अधिकार आहेत; परंतु त्यांना त्यांच्या कामाची व्याप्ती माहीत नाही. अंतर्गत राजकारण आणि हेव्यादाव्यामुळे सरपंच एका चाकोरीत अडकले आहेत. आपल्याला किती अक्कल आहे यापेक्षा आपण किती लोकांना बरोबर घेऊन काम करतो यावर आपली अक्कल ठरत असते. त्यामुळे कोणाचाही भेदभाव आणि कटुता मनात ठेवून काम न करता सरपंचांनी आईच्या मायेने सर्वांना बरोबर घेऊन ग्रामविकास केला पाहिजे, असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच, राष्टÑपती पुरस्कार विजेते भास्करदादा पेरे यांनी केले.
नाशिक : सरपंचांना जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त कामाचे अधिकार आहेत; परंतु त्यांना त्यांच्या कामाची व्याप्ती माहीत नाही. अंतर्गत राजकारण आणि हेव्यादाव्यामुळे सरपंच एका चाकोरीत अडकले आहेत. आपल्याला किती अक्कल आहे यापेक्षा आपण किती लोकांना बरोबर घेऊन काम करतो यावर आपली अक्कल ठरत असते. त्यामुळे कोणाचाही भेदभाव आणि कटुता मनात ठेवून काम न करता सरपंचांनी आईच्या मायेने सर्वांना बरोबर घेऊन ग्रामविकास केला पाहिजे, असे प्रतिपादन औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच, राष्टÑपती पुरस्कार विजेते भास्करदादा पेरे यांनी केले.
लोकमतच्या वतीने आयोजित ‘सरपंच अवॉर्ड’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. सरपंचांना काही कळत नाही असे समजले जाते; परंतु सरपंचांना जे कळते ते इतर कुणालाही कळत नाही. गावातील कोणतीही गोष्ट करण्यासाठीची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. कोणताही प्रश्न निर्माण झाला तर त्याला दोष न देता त्यातून मार्ग काढून आपण काहीतरी शिकले पाहिजे.
गावचा विकास करण्यासाठी प्रत्येकवेळी पैसाच लागतो असे नाही, तर अशी काही कामे आहेत की ज्याला निधीची गरज नसते. झाडे लावणे, पाणी स्वच्छता, सांडपाणी नियोजन, हगणदारीमुक्त मोहीम यासाठी निधी मागण्याची गरज नाही. मानव कल्याणासाठीच्या या योजना सहज राबविता येतात. सरपंचाला कुणी अज्ञानी म्हणत असले तरी ग्रामपंचायत चालविणे हे प्रशासन चालविण्याइतके सोपे नाही, असेही पेरे म्हणाले.
सरपंचाला काम करून घेण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागेल. प्रत्येक काम हे सरपंचाने करायचे नसते. शासनाने तुम्हाला ग्रामसेवक हा सचिव दिला आहे. त्याच्याकडून लिखापडीची सर्व कामे करून घ्या, त्याला कामाला लावा, असा सल्ला त्यांनी दिला.
‘असे करू नका; पण कसे करा हे कुणी सांगत नाही...’भास्करदादा पेरे यांनी आपल्या खुमासदार शेैलीतील ग्रामीण ढंगाच्या भाषणाने अवघे सभागृह खिळवून ठेवले. त्यांनी प्रशासकीय कामातील औपचारिकतेवर नेमके भाष्य केले. रस्त्यावर अनेक ठिकाणी येथे पार्किंग करू नका, येथे थुंकू नका असे फलक लिहिलेले असतात. येथे नको तर मग कुठे, असा मार्ग मात्र दाखविला जात नाही. प्रशासन राबविणारी यंत्रणा नेमके हेच विसरते आणि त्यातून साध्य मात्र काहीच होत नाही. काय करू नका यापेक्षा काय करावे असे काम प्रशासनाकडून अपेक्षित आहे. या बाबीचा खूप विचार केला. नंतर यातून मला कल्पना सुचली आणि मी गावात ठिकठिकाणी ४० बेसिन बसविले, बेसिनला चोवीस तास पाणी दिले आणि तेथे लिहिले- ‘येथे थुंका’.
माझे पाटोदा गाव संपूर्णपणे हगणदारीमुक्त केले आहे. आमच्या गावातील दोन महिलांना मी बोलताना ऐकले. त्या एकमेकींना विचारत होत्या, तू गावाला गेली होती का? दुसरी म्हणे, नाही. दुसरीने पहिलीला विचारले, तू गेली होती का? तीही नाही म्हणाली. दोघीही गावाला गेलेल्या नाहीत तरीही यांना असे का वाटले की ती गावाला गेली असावी. हे बोलणे मी ऐकल्यानंतर विचार केला असे का झाले. त्यातून मला आणखी एक मार्ग सापडला. गाव हगणदारीमुक्त झाल्याने रोज सकाळी भेटणाºया या महिला एकमेकींना भेटेनासे झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यातील संवाद कमी झाला. मग आम्ही गावाच्या चारही बाजूला धोबीघाट तयार केले, तेथे धुणे धुण्यासाठीची व्यवस्था केली. त्यामुळे महिलांना एकमेकींना भेटण्यासाठीची जागा झाली.