नाशकात स्मार्ट सिटी अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:15 PM2017-12-28T16:15:54+5:302017-12-28T16:21:46+5:30
कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय
नाशिक - माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सदर प्रकल्पांना गति मिळण्यासाठी ९० दिवसांचा निविदा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचाही महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.
स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची व्याप्ती पाहता कंपनीच्या वार्षिक अंदाजपत्रकात सुधारणा करण्यात आली. यावेळी, माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने, स्मार्ट सिटी आॅपरेशन सेंटर, स्मार्ट कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, सिटीझन एक्सपिरियन्स सेंटर, इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, स्मार्ट पार्कींग मॅनेजमेंट सिस्टम याशिवाय, सेन्सर, वायफाय सिस्टम यांचा समावेश आहे. सदर प्रकल्पांना गति मिळावी यासाठी निविदा कालावधी ४५ दिवसांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, बैठकीत जनसंपर्क अधिकारी, लघुलेखक यांच्यासह ८ तांत्रिक पदांनाही मंजुरी देण्यात आली. यावेळी, सुरक्षित नाशिकचा आढावा घेण्यात आला. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी त्यातील काही अडचणी सांगितल्या. आॅप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यासाठी राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे बदललेले सचिव श्रीनिवासन यांचेशी चर्चा करण्याचे ठरले. सोलर पॅनल आणि पायलट स्मार्ट रोडच्या निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली. येत्या सप्ताहात आयसीटी इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट पथदीप, स्मार्ट पार्कींग, पब्लिक सायकल शेअरिंग, प्रोजेक्ट गोदाअंतर्गत पायाभूत सुविधा व सुशोभिकरण या प्रकल्पांच्याही निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला, कंपनीचे संचालक महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते, तज्ज्ञ संचालक तुषार पगार यांचेसह अन्य संचालक, अधिकारी उपस्थित होते.