मनसेच्या नेतृत्वाखाली ३५० सफाई कामगारांचा हल्लाबोल, ठेकेदाराच्या विरोधात घोषणाबाजी
By संजय पाठक | Published: October 19, 2022 04:39 PM2022-10-19T16:39:27+5:302022-10-19T16:42:27+5:30
नाशिक महापालिकेच्यावतीने वॉटर ग्रेस कंपनीमार्फत नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागात सातशे कामगार तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
नाशिक : महापाालिकेने आउटसोर्सिंगचे कंत्राट दिलेल्या वॉटर ग्रेस कंपनीने साडे तीनशे सफाई कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. ठेकेदाराच्या या कृतीचा निषेध करून या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी बुधवारी (दि. १९) महापालिकेच्या मुख्यालयावर हल्लाबोल केला.
नाशिक महापालिकेच्यावतीने वॉटर ग्रेस कंपनीमार्फत नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागात सातशे कामगार तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. यातील साडेतीनशे कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे.
तर, मनसेचे नेतृत्व स्वीकारल्यानेच कामगारांना कामावरून काढून टाकल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी महापालिकेवर धडक दिली असून, कामगार पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय घेतल्याशिवाय हटणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.