पॉलिशच्या बहाण्याने ६० हजारांचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2022 01:50 AM2022-07-04T01:50:06+5:302022-07-04T01:51:58+5:30
न्याचे पॉलिश करून देतो असे भासवून ६० हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन भामटा पसार झाल्याची घटना निफाड येथे शनिवारी घडली.
निफाड : सोन्याचे पॉलिश करून देतो असे भासवून ६० हजारांचे सोन्याचे दागिने घेऊन भामटा पसार झाल्याची घटना निफाड येथे शनिवारी घडली. निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयाजवळ निशाद लेडीज टेलर दुकान आहे. दिनांक २ जुलै रोजी या दुकानाच्या संचालिका सेहलवाम राजू निशाद या सकाळी ८.३० वाजता दुकानात आल्या व साफसफाई करू लागल्या यावेळी भामटा दुचाकीवर दुकानात आला व निशाद यांना सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगितले. निशाद यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गळ्यातील २ तोळे सोन्याची चेन व कानातील १ तोळे वजनाचे वेल या भामट्याजवळ दिले. भामटा दागिन्यांना पॉलिश करू लागला. यावेळी निशाद या साफसफाईसाठी खाली वाकल्या तेवढ्या वेळात सदर भामटा दुचाकीवरील दुसऱ्या जोडीदारासोबत उगाव रोडकडे फरार झाला.
याबाबत निशाद यांनी निफाड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक सागर घोलप हे करीत आहेत.