अल्पवयीन मुली ‘अनलॉक’; बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:44+5:302021-07-02T04:10:44+5:30
कोरोनाची पहिली लाट २०२० च्या मार्चपासून शहरासह जिल्ह्यात वेगाने पसरण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या लॉकडाऊन काळात मुली बेपत्ता होण्याचे ...
कोरोनाची पहिली लाट २०२० च्या मार्चपासून शहरासह जिल्ह्यात वेगाने पसरण्यास सुरुवात झाली होती. पहिल्या लॉकडाऊन काळात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण घटले असे नाही, तर या संपूर्ण वर्षभरात १६३ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी १४८ मुलींना शोधण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. तसेच चालूवर्षीही मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडतच आहेत. आतापर्यंत ७९ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. त्यापैकी पोलिसांनी ५२ मुलींना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे, तर उर्वरित २७ मुलींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाच्या लाटेतही मुलींचे घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून जाण्याचे प्रमाण कमी झालेले दिसून येत नाही. कोरोनामुळे वाहतुकीवर आलेले निर्बंध आणि बाजारपेठांसह लॉजिंग-बोर्डींगवरही आलेले निर्बंध, तसेच पर्यटनाच्या बंद झालेल्या वाटा, बंद असलेली धार्मिक तीर्थक्षेत्र अशा सर्व परिस्थितीसुध्दा मुली बेपत्ता होतच आहेत, हे विशेष!
---इन्फो---
८७ टक्के मुलींचा लागला शोध
मागीलवर्षी १६३ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी पोलिसांनी १४८ मुलींना शोधून काढले. सुमारे ८७ टक्के मुलींना शोधण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. उर्वरित १५ मुलींचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. तसेच यावर्षी ७९ मुली बेपत्ता झाल्या असून त्यापैकी ५२ मुली सापडल्या असून २७ मुलींच्या पालकांना अद्यापही त्यांची प्रतीक्षा कायम आहे.
---इन्फो---
शोधकार्यात अडचणी काय ?
अनेकदा मुली प्रेमवजा आकर्षणापोटी घरातून कोणालाही न सांगता निघून गेलेल्या असतात, असेही पोलिसांच्या तपासात पुढे आले. यामुळे पालकांकडून सुध्दा अशाप्रकारची माहिती बदनामीच्या भीतीने सुरुवातीला दडविण्याचा प्रयत्न होतो.
पालकांकडून माहिती लपविण्याच्या प्रकारामुळे तपासी यंत्रणेला योग्य दिशा सापडत नाही.
मुलींचा मोबाईल अनेकदा बंद असतो, तर काही मुलींकडून नंबरच बदलून टाकलेला असतो.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस अनेकदा माग काढतात; मात्र जोपर्यंत सीमकार्ड ॲक्टिव्ह होत नाही, तोपर्यंत ‘लोकेशन’ ट्रेस करणे अवघड होऊन जाते.
जेव्हा प्रेमप्रकरणाची माहिती समोर येते, तेव्हा त्या मुलाचा पत्ता काढून त्याची माहिती घेत पोलिसांकडून त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न होतो.
---कोट---
अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडत असल्या तरीदेखील पोलीस प्रशासन त्यांचा कसोशीनेे शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत २०० मुलींना शोधण्यात यश आले आहे. उर्वरित मुलींचाही थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न केला जात असून सर्वतोपरी तपास केला जात आहे. लवकरच त्या मुलींनाही शोधण्यात यश येईल.
- नवलनाथ तांबे, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा
010721\01nsk_10_01072021_13.jpg~010721\01nsk_12_01072021_13.jpg
मुली अनलॉक~मिसिंग लोगो