भाजीबाजार प्रवेशद्वारावर भूमिगत नाल्याला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:28 AM2019-09-28T00:28:28+5:302019-09-28T00:28:56+5:30
दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर भूमिगत नाल्याला पडलेले भगदाड बुजविण्याच्या कामाला पावसामुळे व्यत्यय येत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. देवळाली मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात होणार असल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे.
नाशिकरोड : दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर भूमिगत नाल्याला पडलेले भगदाड बुजविण्याच्या कामाला पावसामुळे व्यत्यय येत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. देवळाली मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात होणार असल्याने गैरसोय होण्याची शक्यता आहे.
नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजारच्या प्रवेशद्वारावर सव्वा वर्षापूर्वी भूमिगत नाल्याला भगदाड पडले होते. सदर धोकादायक भगदाड बुजविण्यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. उशिरा सुचलेले शहाणपण या म्हणीप्रमाणे मनपा प्रशासनाकडून भूमिगत नाल्याला पडलेले भगदाड बुजविण्याचे काम महिनाभरापूर्वी हाती घेण्यात आले. नाल्याचे भगदाड बुजविण्यासाठी दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वार ते रस्त्यामधील दुभाजकापर्यंत जेसीबीच्या साह्याने खोदाई करण्यात आली. त्यामुळे दुर्गा उद्यान, हुतात्मा स्मारक कोपऱ्यापासून अनुराधा चौकापर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघाची सर्व निवडणूक प्रक्रिया नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयात होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश श्रींगी यांनी जाहीर केले आहे. उमेदवारी अर्ज वाटप, भरणे, छाननी, हरकती, माघार, मतदान यंत्रवाटप, मतमोजणी आदी सर्व प्रक्रिया मनपा विभागीय कार्यालयात होणार आहे. भूमिगत नाल्याचे भगदाड बुजविण्याच्या कामाला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वांचीच गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे. तर भाजीबाजारात जाणाºया नागरिक, महिलांना महिन्याभरापासून त्रास सहन करावा लागत आहे. नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न या म्हणीप्रमाणे भूमिगत नाला भगदाड बुजविण्याची गत झाली आहे.
नाले-गटारीतील पाणी साचते
गणेशोत्सवापासून परतीचा पाऊस दररोज हजेरी लावत असल्याने भगदाड बुजविण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. खोदाई केलेल्या ठिकाणी पावसाचे व नाले-गटारीमधून वाहणारे पाणी साचत असल्याने पंप लावून पाण्याचा उपसा करून काम केले जात आहे. मात्र दररोज पावसामुळे पाणी साचत असल्याने कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. यामुळे काम संथ गतीने सुरू आहे.
अवघ्या चार दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून, नाशिकरोडची ग्रामदेवता असलेल्या श्री दुर्गादेवी मंदिरात नवरात्रीत दर्शनासाठी मोठी गर्दी होते. नाल्याचे भगदाड बुजविण्याच्या कामामुळे दुर्गा उद्यान हुतात्मा स्मारक ते अनुराधा चौकापर्यंत एका बाजूचा रस्ता वाहतुकीसााठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेजारच्या एकाच रस्त्यावरून दोन्हीकडून वाहतूक सुरू आहे. वाहतुकीची कोंडी, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांची नवरात्रीत नियुक्ती करण्यात यावी.
- सुनील देवकर,
सामाजिक कार्यकर्ते