महामार्गावर चार ठिकाणी अंडरपास

By Admin | Published: January 30, 2015 12:19 AM2015-01-30T00:19:17+5:302015-01-30T00:19:26+5:30

दिल्लीत निर्णय : कमोदनगर, लेखानगर, रासबिहारी, वाघ कॉलेजजवळ नागरिकांची होणार सोय

Underpass in four places on the highway | महामार्गावर चार ठिकाणी अंडरपास

महामार्गावर चार ठिकाणी अंडरपास

googlenewsNext

 नाशिक : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील उड्डाणपुलामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा गोंधळ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कमोदनगर, लेखानगर, रासबिहारी स्कूल व के. के. वाघ कॉलेजजवळ अंडरपास तयार करण्याचा निर्णय गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घेतला.
उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यापेक्षा अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा होत आहे. या उड्डाणपुलामुळे शहराचे दोन भाग पडले असल्याची तक्रार होती. परंतु नागरिकांना रस्ता ओलांडून जाणे मुश्कील झाले आहे. यासंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी व्दारका, इंदिरानगर, पंचवटी या भागांना भेट दिल्या होत्या. त्यांनतर महामार्ग प्राधिकरणाशी संबंधित विषय असल्याने थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले. त्यानुसार गुरुवारी दिल्ली येथे बैठक संपन्न झाली. यावेळी विविध निर्णय घेण्यात आल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली.
कमोदनगर, लेखानगर, रासबिहारी स्कूल आणि के. के. वाघ कॉलेज येथे महामार्ग विभागाने जंक्शन आणि पादचारी मार्ग न केल्याने अपघात होत होते. त्यामुळे या चारही ठिकाणी वाहने रस्ता ओलांडू शकतील, असे अंडरपास तयार करण्यात येणार आहे. पंचवटी कॉलेज येथे पुलाखालून पादचाऱ्यांसाठी अंडरपास तयार करण्यात येणार आहे. द्वारका येथे रस्त्यात असलेला
(हनुमान मंदिर) पादचारी मार्ग स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच येथील सर्व्हीस रोड ७ मीटरवरून ९ मीटरपर्यंत रुंद करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वारकाजवळ उड्डाणपुलावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी असलेल्या मार्गालगतचे वाहतूक बेट हटविण्यात येणार आहे. तेथे रस्ताच रुंद करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
इंदिरानगरकडे जाताना वाहतुकीला अडथळा होणाऱ्या जॉगिंग ट्रॅकचा काही भाग मागे घेण्यात येणार असून, त्यामुळे तेथील काही झाडे तोडावी लागणार आहे. उच्च न्यायालयाने महापालिकेस झाडे तोडण्यास मनाई केल्याने त्यासंदर्भात उच्च न्यायालयाची परवानगी घेऊन तेथील झाडे तोडावी, असे गडकरी यांनी सांगितले.
यावेळी तीन वास्तुविशारदांनी उड्डाणपुलालगतच्या वाहतूक समस्या सोडविण्यासाठी तयार केलेला आराखडा गडकरी यांना आमदार फरांदे यांनी सादर केला. वास्तुविशारद विवेक जायखेडकर, विजय अग्रवाल आणि कुटे यांनी हा आराखडा तयार केला आहे. लवकरच नाशिकमध्ये ट्रॅफीक इंजिनिअर पाठवून अन्य पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे.
बैठकीस महामार्ग विभागाचे सचिव सिंग, कार्यकारी अभियंता खोडसकर, नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्तालयातील निरीक्षक बागवान आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Underpass in four places on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.