अंडरपासचे काम पोलीस बंदोबस्तात
By Admin | Published: November 15, 2015 11:35 PM2015-11-15T23:35:36+5:302015-11-15T23:36:48+5:30
लेखानगर : विरोध मोडून काढण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय
नाशिक : इंदिरानगर येथील बोगदा बंद केल्यानंतर स्टेट बॅँक चौकाऐवजी लेखानगरनजीक अंडरपास करण्यास स्थानिक नागरिकांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, तसे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात हे काम कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोविंदनगर-इंदिरानगरला जोडणारा बोगदा सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे इंदिरानगरहून गोविंदनगरकडे येऊ पाहणाऱ्या नागरिकांना थेट स्टेट बॅँक चौकानजीक वळसा घेऊन पुन्हा इंदिरानगर बोगद्यापर्यंत माघारी परतावे लागते. त्यासाठी साधारणत: दोन किलोमीटर अधिकचे अंतर कापावे लागते. मुळात इंदिरानगरचा बोगदा बंद करायला नागरिकांचा प्रचंड विरोध असताना त्यात पुन्हा त्यांना दोन किलोमीटरचा फेरा घालताना वेळ व पैशांची उधळपट्टी होत होती. इंदिरानगरचा बोगदा बंद करून स्टेट बॅँकेत वाहने वळविल्याने त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ लागली, त्यातच या ठिकाणी हॉस्पिटल असल्याने वाहनांचा गोंगाट होऊन सायलेंस झोनचे उल्लंघन होत असल्याची तक्रार केली जात होती. त्यावर तोडगा म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लेखानगर येथील बालभारती कार्यालयासमोरून अंडरपास सुरू करण्याची तयारी केली व त्याला प्राधिकरणाची अनुमतीही घेण्यात आली होती. महिनाभरापूर्वी सदरचे काम सुरू करताच, महापालिकेचे स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी लेखानगर येथे अंडरपास करण्यास विरोध दर्शविला होता.
या कामासाठी गेलेल्या कामगारांना पिटाळून लावून
दोन वेळा काम बंद केले होते.
दरम्यान, लेखानगर येथील अंडरपाससाठी आग्रही असलेले पोलीस व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदरचे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा विडा उचलला असून, नागरिकांकडून होणारा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस बंदोबस्तात काम करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी पंधरा दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांना पत्र देऊन पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती, परंतु नवरात्र व दिवाळीनिमित्त पाहून पोलीस बंदोबस्त देण्यास आयुक्तांनी असमर्थता व्यक्त केली, आता मात्र पोलीस बंदोबस्त देण्याचे मान्य करण्यात येऊन तसे पत्रही पोलीस आयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले दिले आहे. सूत्रांच्या मते पुढच्या आठवड्यात पोलीस बंदोबस्तात लेखानगर अंडरपासचे काम सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)