बाजार समितीतील धान्य किराणा व्यवहार पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:44+5:302020-12-15T04:31:44+5:30
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एक टक्का सेवा शुल्काविरोधात नाशिकमधील ...
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या एक टक्का सेवा शुल्काविरोधात नाशिकमधील घाऊक धान्य किराणा व्यापारी व किरकोळ किराणा व्यापारी संघटनांनी पुकारलेला बंद मिटल्याने सोमवार (दि.१४) सकाळपासूनच बाजार समिती आवारातील सर्व धान्य, किराणा मालाचे व्यवहार पूर्ववत सुरू झाले.
नाशिक बाजार समिती आवारात घाऊक धान्य किराणा व्यापारी सघटनांनी चार दिवसांपासून संप केल्याने त्याचा शहरातील बाजारपेठेवरही मोठा परिणाम होण्याचे संकेत निर्माण झाले होते. व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सेवा शुल्क वसुलीला विरोध केला होता, तसेच शनिवारी संपूर्ण शहरातील किराणा व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून शुल्क वसुलीला विरोध दर्शविला होता; मात्र त्यानंतरही बाजार समितीतील पदाधिकारी सेवा शुल्क वसुलीच्या निर्णयावर ठाम राहिल्याने व्यापारी आणि बाजार समिती पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळामार्फत बाजार समिती पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी संप मागे घेतल्याने किरकोळ व्यापाऱ्यांना धान्य, किराणा मालाचा पुरवठा सुरळीत सुरू झाला असून, घाऊक व्यापाऱ्यांना परराज्यातून येणाऱ्या मालाची वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे.