नाशिकसाठी महायुतीकडून येऊ शकते अनपेक्षित नाव!
By धनंजय रिसोडकर | Published: April 8, 2024 03:59 PM2024-04-08T15:59:19+5:302024-04-08T16:00:49+5:30
विद्यमान आमदारांसह संघटनाप्रमुखांपैकी कुणाचेही नाव राहू शकते आघाडीवर
धनंजय रिसोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : नाशिकच्या जागेबाबतचा उमेदवार निश्चितीचा तिढा म्हणजे महायुतीसाठीचा सर्वांत कठीण पेपर ठरत आहे. त्यामुळे या कठीण पेपरचे उत्तर सोडविण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या विद्यमान आमदारांपैकीच एक किंवा संघटनांच्या जिल्हा प्रमुखांची नावे चर्चेत आली आहेत. अशा परिस्थितीत महायुतीकडून अनपेक्षित नावाचा पत्ता फेकून महाआघाडीच्या उमेदवाराला चकीत करण्याचा प्रयत्न करण्याची चिन्हे आहेत.
नाशिकच्या जागेसाठी आघाडीकडून राजाभाऊ वाजे यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊन आता जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी होत आला आहे. त्यामुळे महायुतीकडून उमेदवार घोषणेचा खेळ सुरू असताना वाजे यांच्या प्रचाराला अधिकाधिक वेळ मिळणे ही बाब महायुतीच्या उमेदवाराच्या दृष्टीने सर्वाधिक त्रासदायक ठरू शकते. प्रचारासाठी आता केवळ ४० दिवसांचा कालावधी उरलेला असूनही महायुतीचे तिन्ही पक्ष आग्रही राहिले असल्याने उमेदवारीचा तिढा नव्हे गुंता झाला असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यातील काटाकाटी अगदी अंतिम टप्प्यात आली आहे.
महायुतीकडून नाशिक लोकसभेसाठी नव्या उमेदवारांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. तसेच, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीने नवे सर्वेक्षण सुरू केले असून, यात नव्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यात शिंदेसेनेकडूनच आता जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव, तर भाजपकडून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्यासह नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांचे नावदेखील चर्चेत येऊ लागले आहे. तसेच, वाजे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुढे येऊ लागले आहे. त्यातही आता महायुतीतील नावांपैकी सर्वाधिक सक्षम उमेदवाराबाबत चाचपणी सुरू असून गुढीपाडवा किंवा त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंतिम नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.