अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 05:44 PM2019-10-17T17:44:41+5:302019-10-17T17:49:04+5:30
उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
नाशिक : आंघोळीसाठी काढलेले गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) हिरावाडी परिसरात घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कार्तिक अनिल शेखरे असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडीत घरकुल आवास योजना मारु ती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या वसाहतीत राहणाऱ्या नातेवाइकाच्या मुलीच्या वाढदिवसाला चांदोरी येथे राहणारे शेखरे गेल्या आठवड्यात मुलगा कार्तिकसह आले होते. शुक्र वारी (दि.११) संध्याकाळी शेखरे यांचा मुलगा कार्तिकला आंघोळीसाठी गरम पाणी केले. गरम पाणी बाथरूममध्ये बादलीत ठेवले असता त्याचवेळी कार्तिक बाथरूममध्ये होता. दरम्यान, गरम पाण्याची बादली कलंडल्याने कार्तिक चे शरीर भाजले. त्यात त्याच्या उजव्या हाताला, पोटाला, पाठीला गरम पाण्याचे चटके बसल्याने तो ३५ टक्के भाजला गेला. त्याला तत्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी हिरावाडी परिसरात गरम पाकात पडल्याने एका बालकाचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक तात्या वाघ अधिक तपास करत आहे.