वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 01:34 AM2021-11-04T01:34:36+5:302021-11-04T01:35:42+5:30
शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या युनिट-४ मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई नितेश प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. वृंदावन नगर) यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे निधन झाले. दीपावलीसाठी त्यांनी रजा घेत गावी जाण्याचा बेत आखला होता.
नाशिक : शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या युनिट-४ मध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई नितेश प्रकाश गायकवाड (वय ४२, रा. वृंदावन नगर) यांचा राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने अचानकपणे निधन झाले. दीपावलीसाठी त्यांनी रजा घेत गावी जाण्याचा बेत आखला होता. दीपावलीच्या काळात झालेल्या पोलिसाच्यामृत्यूमुळे आयुक्तालयात शोककळा पसरली.
दिवाळीनिमित्त गायकवाड हे त्यांच्या कुटुंबीयांसह जालना येथे त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले; मात्र मंगळवारी (दि. २) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यामुळे गायकवाड खुर्चीवर काही मिनिटे बसले. या दरम्यान, त्यांना छातीत वेदना होऊन हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा वर्षांची कन्या स्तुती आणि तीन वर्षांचा मुलगा श्रवण असा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय हे स्वत: जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. उत्तरीय तपासणी पार पडेपर्यंत पाण्डेय हे शवविच्छेदन कक्षात थांबून राहिले. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत सांत्वन केले. आयुक्तालयात ही दुसरी घटना घडली असून, पोलिसांचे शारीरिक, मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आयुक्तालयाकडून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.