तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 08:38 PM2021-10-19T20:38:11+5:302021-10-19T20:39:05+5:30
पिंपळगाव बसवंत : सप्तश्रृंगी गडावरील गणपती मंदिराजवळील तलावात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कोजागरीच्या पूर्वसंध्येला घडली. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याचा अंदाज वर्तविला जात असून याबाबत कळवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नीलेश प्रभाकर पवार (१८) असे युवकाचे नाव असून कोजागरीनिमित्ताने पिंपळगाव ते सप्तशृंगी गडावर पायी देवीच्या दर्शनाला मित्रांसोबत नीलेश गेला होता. याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत परिसरातील अंबिकानगर येथे राहणारा नीलेश प्रभाकर पवार हा कोजागरी पौर्णिमेनिमित्त मी देवीच्या दर्शनाला पायी मित्रांसोबत चाललो, असे आईला सांगून गेला. सोमवारी (दि.१८) रात्री गेला. रात्रभर देवीच्या नावाचा जागर करत नीलेश व मित्र परिवार गडावर पोहोचले.
मात्र, देवीचे दर्शन घ्यायचे म्हणून हात-पाय धुण्यासाठी गणपती मंदिराजवळ असलेल्या तळ्याच्या कडेला गेला असता तो पाण्यात पडला आणि त्यातच बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रसंगी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर त्याच्या गावी पिंपळगाव बसवंत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीलेशच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, भाऊ असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.