ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:03 PM2020-12-23T16:03:44+5:302020-12-23T16:07:22+5:30

लोहोणेर : कोरोना महामारीचा भयानक जीवघेणा संसर्ग व संभाव्य धोका वाढू नये म्हणून ग्रामीण भागातील यात्रौत्सव रद्द केले जात आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणारा यात्रांचा आनंद घेता येत नसल्याने बच्चेकंपनी व नागरिकांकडून नाखुशी व्यक्त केली जात आहे.

Unhappy with the cancellation of all pilgrimages and ceremonies in rural areas | ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी

ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी

Next
ठळक मुद्देतमाशा, कुस्तीचे फड रंगणार नसल्याने यंदा आनंदावर विरझण

लोहोणेर : कोरोना महामारीचा भयानक जीवघेणा संसर्ग व संभाव्य धोका वाढू नये म्हणून ग्रामीण भागातील यात्रौत्सव रद्द केले जात आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणारा यात्रांचा आनंद घेता येत नसल्याने बच्चेकंपनी व नागरिकांकडून नाखुशी व्यक्त केली जात आहे.

देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, कळवण, बेज, डांगसौंदाणे, ओझर, वडाळी, तीसगाव, मांगीतुंगी व सटाणा येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज, भाक्षी व चंदनपुरी येथील खंडेराव यात्रेसह इतरही काही गावांतील लहान मोठ्या यात्रांचे कार्यक्रम यंदा थांबविण्यात आले आहेत. कसमादे सह परिसरातील ग्रामीण भागात दिवाळीनंतर बहुतेक गावांत यात्रौत्सव हिवाळ्यात सुरू होतात. यावेळी खरीप हंगाम संपून रब्बीची कामे सुरू झालेली असते. अशा कामाच्या शिनवट्यात ग्रामयात्रा हया सर्वसामान्य नागरिकांना व अबाल वृध्दांसह महिला मजूर यांना विरंगुळा देत आनंदाची उधळण करतात.

मनोरंजनाचे कार्यक्रम, बच्चे कंपनीची धमाल, माहेरवाशीणींचे येणे, दुकानांमधून वस्तूंची व खाद्यपदार्थांची खरेदी, लोकनाट्य तमाशा, कुस्त्या, शर्यती अशा अनेक दृष्टीने ह्या यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत असतात. परंतु मार्च महिन्यापासून या भागातील सर्वच यात्रौत्सव बंद आहेत.
दिवाळीनंतरच्या नवीन हंगामात यात्रा पुन्हा चालू होतील अशी सर्वांनाच आशा वाटत होती. परंतु कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून गावातील जागरूक मंडळींनी ग्रामस्थांना संयम पाळण्याचे आवाहन करत आपआपल्या गावातील यात्रौत्सव यंदा रद्द केले जात आहेत. यामुळे अनेक यात्रा उत्सवात खेळणी, खाद्य पदार्थ व लोकनाट्य तमाशा कलाकार, मौत का कुहा आदी करमणुकी सह इतर दुकाने लावणाऱ्या लहान - मोठ्या व्यावसायिकांनीही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेकांची उपासमार होत असून लाखो रुपयांची होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर जावे यासाठी ग्रामदैवतांना नवस केले जात आहेत.कोरोना मुळे मात्र या वर्षी यात्रेच्या आनंदा वर विरजण पडले आहे.

यंदा यात्रौत्सव बंद असल्याने कुस्त्यांच्या दंगली व लोकनाट्य तमाशा कार्यक्रम बंद आहेत. यामुळे पहिलवानांचा हिरमोड होत आहे. तमाशावाली मंडळी यांची पण तशीच गत होत आहे.
- कारभारी पवार, अध्यक्ष, यात्रा कमिटी, भऊर, देवळा.

कोरोनाच्या महामारीमुळे यंदा सर्वत्र भरणाऱ्या यात्रा महोत्सव रद्द करण्यात आल्या आहेत. दरवर्षी विविध ठिकाणी भरणाऱ्या यात्रामध्ये कुस्तीचे फड गाजत असतात. त्यासाठी वर्षभर मेहनत व सराव करावा लागतो. यात्रेत या मेहनतीचे फळ देणगी रूपाने मिळत असते. यात्रा बंद झाल्याने कुस्तीचे फड रंगणार नसल्याने यंदा आनंदावर विरझण पडले आहे.
- गणेश बागुल, कुस्ती पहिलवान, लोहोणेर.

Web Title: Unhappy with the cancellation of all pilgrimages and ceremonies in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.