नाराज संचालकांनी फिरविली बैठकीकडे पाठ

By admin | Published: September 7, 2015 11:05 PM2015-09-07T23:05:29+5:302015-09-07T23:07:08+5:30

अज्ञातस्थळी गुफ्तगू : जिल्हा बॅँक सभा तहकूब

Unhappy directors read the meeting | नाराज संचालकांनी फिरविली बैठकीकडे पाठ

नाराज संचालकांनी फिरविली बैठकीकडे पाठ

Next

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या मनमानी काराभाराविरोधात नाराज असलेल्या डझनभर संचालकांनी संचालक मंडळाच्या बैठकीकडे पाठ फिरविल्याने सोमवारी (दि.७) जिल्हा बॅँकेची मासिक बैठक गणपूर्तीअभावी तहकूब करण्याची नामुष्की व्यवस्थापनावर ओढवली.
काल दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची संचालक मंडळाची मासिक बैठक बॅँकेच्या शरदचंद्र पवार सभागृहात बोलविण्यात आली होती. बैठकीत १५ महत्त्वांच्या विषयांवर चर्चा होणार होती. त्याचप्रमाणे नुकतीच गाजत असलेली सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी, नोकरभरतीचा विषय यावरही बैठकीत चर्चा होणार होती. मात्र काल दुपारी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस संचालक खासदार हरिश्चंद्र चव्हाण,आ. सीमा हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, किशोर दराडे आदि अध्यक्षांसह सहा संचालकच उपस्थित असल्याने बैठक गणपूर्तीअभावी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेपासून हाकेच्या अंतरावर काही संचालक उपस्थित असूनही ते बैठकीला उपस्थित राहिले नाही. निर्णय घेताना संचालकांसोबत कोणतीही चर्चा न करणे, परस्पर वादग्रस्त कंपन्यांचा निधी अदा करणे, यासह काही वादग्रस्त विषयांमुळेच संचालक बैठकीस मुद्दामहून उपस्थित राहिले नसल्याची चर्चा आहे.
येत्या २१ सप्टेंबर रोेजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा बॅँकेच्या जुन्या इमारतीत होणार आहे. ही सर्वसाधारण सभाही वादळी ठरण्याची शक्यता आहे. यापुढील काळातील संचालक मंडळाच्या मासिक बैठकांना अनुपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याची खेळी या नाराज गटाकडून करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. संचालकांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात आणि मनमानी कारभाराविरोधात नाराजी असल्यानेच संचालकांनी बैठकीस मुद्दामहून अनुपस्थित राहणे पसंत केल्याचे समजते. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतर नवीन ९७व्या घटनादुरुस्तीनुसार किमान सहा महिने पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास आणता येत नसल्यानेच बैठकांना अनुपस्थित राहण्याचा सोपा मार्ग नाराज गटाच्या संचालकांनी निवडल्याची चर्चा जिल्हा बॅँकेच्या वर्तुळात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Unhappy directors read the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.