सिन्नर तालुक्यात युनिसेफ अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 06:45 PM2019-06-27T18:45:29+5:302019-06-27T18:46:11+5:30
नांदूरशिंगोटे : माता व बाल मृत्यू कमी करण्यासाठी शासनस्तरावरून प्रायोगिक तत्त्वावर उपाययोजना केल्या जात असून त्याची पाहणी करण्यासाठी युनिसेफच्या पथकाने सिन्नर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रास नुकतीच भेट देवून ‘पायलट प्रोजेक्ट’ची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी लाभार्थ्यांची व्यक्तीगत भेट घेत संवाद साधला. तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
मातृत्व व नवजात बालकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी युनिसेफ , सार्वजनिक आरोग्य विभाग, भारती विद्यापीठ, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विदयमाने सदरचा उपक्रम राबविला जात आहे. सदरचा उपक्रम संपूर्ण देशात केवळ महाराष्टÑ राज्यातील सिन्नर व पेठ तालुक्यात गेल्या एक वर्षापासून राबविण्यात येत असून त्याची पाहणी करण्यासाठी पथक आले होते. तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून पथकाने माहिती जाणून घेतली. पथकात भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिनेश बसवाल, राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, युनिसेफच्या मुख्यधिकारी डॉ. यास्मिन अली हक, डॉ. मानसी चोप्रा, डॉ. खंदारीया भुयान, डॉ. राजेश्वरी, भारती विद्यापिठाच्या डॉ. अमृता चटके, डॉ. श्रोत्री आदींचा समावेश होता. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, प्राथमिक आरोग्य अधिकारी नितीन म्हस्के यांनी पथकाचे स्वागत करत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.