प्रकाश आंबेडकरांशिवाय एकीकरण अशक्य : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:24 AM2018-03-03T01:24:47+5:302018-03-03T01:24:47+5:30
विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला.
नाशिक : विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला. काळाराम मंदिर सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आठवले नाशिकमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत रिपाइंचे ऐक्य होणे आवश्यक वाटत असेल तर ऐक्याची घोषणा करणाºयांना अगोदर ऐक्याचा अजेंडा राबविला पाहिजे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि जबाबदारी स्वीकारली तर आपण आपला पक्ष विलीन करून ऐक्यात सामील होऊ, असेही आठवले यांनी सांगितले. समाजाच्या विकासासाठी ऐक्य होणार असेल तर आपण प्रसंगी आपले मंत्रिपद सोडून द्यायलादेखील मागेपुढे पाहणार नाही. इतर कोणत्याही पक्षांनी दलित अत्याचाराचे राजकारण करणे चुकीचे आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष जातीयवादी नाही, तर जे या पक्षाला जातीयवादी म्हणतात तेच जातीयवादी असल्याचा आरोप आठवले यांनी केला. अनेक जातिधर्माचे नेते भाजपामध्ये मंत्री आणि नेते आहेत. त्यामुळे भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणणे चुकीचे असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोरेगाव भीमा प्रकरणी न्यायालयाने तीन महिन्यांचा कालावधी चौकशीसाठी दिल्याने चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी असल्याचेही ते म्हणाले. दलित-मराठा वाद जाणीवपूर्वक पेटविला जात असून, अशा प्रवृत्तींपासून दोन्ही समाजाने सावध राहिले पाहिजे . वास्तविक हे दोन्ही समाज शिवाजी महाराजांच्या काळापासून एकत्र आहेत. त्यांच्यात आता फूट पाडण्याचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राणेंनी आॅफर स्वीकारावी
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे राज्यातील मोठे नेते आहेत. भाजपाने त्यांना राज्यसभेची आॅफर दिली असेल तर त्यांनी केंद्रात आले पाहिजे. पक्ष वाढीसाठी त्यांनी भाजपाची आॅफर स्वीकारली पाहिजे, असा सल्ला आठवले यांनी राणे यांना दिला. राज्यात शिवसेनेने राणे यांच्या मंत्रिपदाला आक्षेप घेतल्यामुळे राणे यांच्यासाठी फडणवीस सेनेची नाराजी ओढावून घेणार नाहीत. त्यामुळेच राणे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश अनिश्चित आहे. राणे यांना मंत्रिपद मिळाले तर सेना सत्तेतून बाहेर पडेल आणि त्यांना राष्टÑवादी तसेच कॉँग्रेसने साथ दिली तर भाजपा सरकार पडू शकेल अशी शक्यता गृहीत धरून कदाचित राणे यांची मंत्रिपदावर वर्णी लागणे तूर्तास शक्य नसल्याचे आठवले यांनी सांगितले.