मनपा शाळांमधील खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश
By admin | Published: May 30, 2016 11:16 PM2016-05-30T23:16:12+5:302016-05-30T23:51:10+5:30
स्थायीची मंजुरी : साडेआठ हजार विद्यार्थ्यांना लाभ
नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत महापालिकेतील पहिली ते आठवी इयत्तेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसोबतच खुल्या व इतर मागासवर्गीय संवर्गातील विद्यार्थ्यांनाही शालेय गणवेश दिला जाणार असून, ८५४८ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. स्थायी समितीच्या सभेत सदर अनुदान मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात जमा करण्यास मंजुरी देण्यात आली.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत महापालिकेतील पहिली ते आठवी इयत्तेतील एससी / एसटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश दिले जाते. त्यानुसार, महापालिकेच्या शिक्षण विभागाने ३३ हजार ६०० विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ६८ विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात अनुदान दहा दिवसांपूर्वीच जमा केले आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला परंतु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसोबत खुल्या आणि इतर मागास संवर्गातील विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याची मागणी होती. त्याला महासभेनेही मंजुरी दिली होती. गणवेशासाठी प्रत्येकी ४०० रुपये उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यासाठी स्थायी समितीने आठ हजार ५४८ विद्यार्थ्यांनाही गणवेश देण्याकरिता शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर अनुदान मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात जमा करण्यास मान्यता दिली. तत्पूर्वी, सदर अनुदान हे मुख्याध्यापकांच्या बॅँक खात्यात जमा न करता मनपाने स्वत:हून गणवेशांची खरेदी करून ते विद्यार्थ्यांना वितरित करण्याची मागणी जायभावे यांनी केली.