विस्थापित, आंतरजिल्हा शिक्षक अधांतरीतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:12 AM2019-06-19T01:12:51+5:302019-06-19T01:13:59+5:30
राज्य सरकारने जिल्हा परिषदेची शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या १३८८ शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुकीच्या जागेवर सोडून नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात आले असले तरी, बदलून आलेल्या शिक्षकांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना गेल्या तीन दिवसांपासून कोठेही नेमणूक नसल्यामुळे शेकडो शिक्षक रिकामे बसून आहेत.
नाशिक : राज्य सरकारने जिल्हा परिषदेची शाळा सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर नाशिक जिल्हा परिषदेच्या १३८८ शिक्षकांच्या बदल्या केल्या असून, बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ नेमणुकीच्या जागेवर सोडून नियुक्तीच्या ठिकाणी हजर करून घेण्यात आले असले तरी, बदलून आलेल्या शिक्षकांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना गेल्या तीन दिवसांपासून कोठेही नेमणूक नसल्यामुळे शेकडो शिक्षक रिकामे बसून आहेत.
शासनाकडून विस्थापित शिक्षकांची यादी प्राप्त होत नसल्यामुळे अशा शिक्षकांची व आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांना नेमणूक देण्यात जिल्हा परिषदेची अडचण झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या बदलीपात्र शिक्षकांकडून शासनाने आॅनलाइन अर्ज मागवून त्यांच्या बदलीची प्रक्रिया शासनस्तरावरून राबविली. मुळात शाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच शासनाने ही प्रक्रिया पूर्ण करावयास हवी होती.
तथापि, ऐन शाळा सुरू होण्याच्या एक आठवड्यापूर्वी शिक्षकांकडून अर्ज मागविले व शाळेच्या एक दिवस अगोदर बदल्यांचे आदेश जारी केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तत्परतेने बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश बजावून त्यांना एका दिवसातच बदलीच्या जागी सोडून नियुक्तीच्या जागेवर रुजू करून घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळले असले तरी, जिल्ह्णातील २३०० शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते, त्यापैकी १३८८ शिक्षकांच्याच बदल्या झाल्या आहेत. उर्वरित शिक्षकांचा समावेश विस्थापितांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदली झालेले शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले; मात्र ते ज्यांच्या जागी बदलून गेले त्या शिक्षकांना पुढील कोणतेही आदेश नसल्याने ते आहे त्याच शाळेत थांबले आहेत. त्यामुळे काही शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक झाले तर काही शाळांमध्ये शिक्षक अपुरे पडले आहेत.
शासनाकडून जिल्हा परिषदेला विस्थापित शिक्षकांची यादी पाठविण्यात येणार असून, त्या सर्वांना समुपदेशनाने रिक्त जागांवर नेमणूक दिली जाणार आहे. मात्र शासनाकडून चार दिवस उलटूनही यादी आलेली नाही.
शासनाने गेल्या आठवड्यात ५१ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने पाठविले आहेत, तसेच
यापूर्वीही ११६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्णात दाखल
आहेत. या शिक्षकांनादेखील नियुक्त्या देण्यात अडचण निर्माण झाली आहे.
चार शाळांचे नव्याने बांधकाम
अलीकडे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील चांदवड व देवळा तालुक्यातील चार शाळांची पडझड झाली असून, तातडीची बाब म्हणून या शाळांचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी सांगितले.