पुन्हा मनपा शाळांचे विलगीकरण अशक्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:19 AM2019-01-29T01:19:51+5:302019-01-29T01:20:06+5:30
महापालिकेच्या ९० शाळांचे पुन्हा विलगीकरण करून १२७ शाळा करण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळांची रचना अशक्य असल्याचे वृत्त आहे.
नाशिक : महापालिकेच्या ९० शाळांचे पुन्हा विलगीकरण करून १२७ शाळा करण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळांची रचना अशक्य असल्याचे वृत्त आहे. शासनाच्या शिक्षण विभागाकडे यासंदर्भातील सर्व प्रकारची पूर्तता पूर्ण करण्यात आली असून, आता केवळ लोकप्रतिनिधींच्या मनात आले म्हणून त्यात बदल करणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
महापालिका शिक्षण मंडळाच्या १२७ शाळा होत्या. परंतु गेल्या वर्षी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिक्षण मंडळाचे विभागात रूपांतर झाल्यानंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण करून घेतले. त्यामुळे १२७ शाळांच्या ९० शाळांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, परंतु यामुळे काही समस्या जाणवत असल्याचे शिक्षण समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. विशेषत: काही शाळांमध्ये पटसंख्या वाढल्याने शिक्षक संख्येचे गणित बिघडले आहे. काही विषयांना शिक्षक नाही, तर काहींनी अतिरिक्तशिक्षक उपलब्ध झाले आहेत, तर काही शाळांमध्ये वेळेची समस्या निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली आणि शाळांचे विलगीकरण करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाधिकारी उदय देवरे यांनी त्यासंदर्भात प्रयत्न करू, असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात मात्र हे कायदेशीरदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे वृत्त आहे.
शिक्षण विभागाने फार मोठा धोरणात्मक निर्णय घेताना शिक्षणखात्याकडील आयडी आणि अन्य सर्व कोड नंबर बदलले आहेत, तर काही कोड नंबर रद्दच करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा त्याच पद्धतीच्या शाळा सुरू करणे अत्यंत अडचणीचे ठरणार असून, शिक्षण विभागाने नकार दिल्याचे वृत्त आहे.