केंद्रीय माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम उद्या नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:27 AM2018-07-06T01:27:07+5:302018-07-06T01:27:16+5:30
नाशिक : देशाच्या सध्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम शनिवार, दि. ७ जुलै रोजी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत चोपडा लॉन्स येथे दुपारी चार वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : देशाच्या सध्याच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीवर नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम शनिवार, दि. ७ जुलै रोजी नाशकात येत असून, त्यांच्या उपस्थितीत चोपडा लॉन्स येथे दुपारी चार वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशातील कथीत अर्थक्रांती विषयी सध्या वेगवेगळे मतप्रवाह आहेत. देशातील आर्थिक सुधारणा केल्याचे अनेक दावे आणि त्याला प्रतिदावे देखील केले जात आहेत. या सर्व प्रश्नांमुळे देशातील वातावरण घुसळून निघत असले तरी यासंदर्भातील वस्तुस्थिती काय आहे, हे समाजातील जाणकार वर्गापर्यंत पोहोचावे यासाठी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून, यापूर्वी ठाणे, नागपूर, औरंगाबाद येथे अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते.
चिदंबरम यांच्या समवेत प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार कुमार केतकर व उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे हेदेखील परिसंवादात सहभागी होतील. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्रातील मंदी, भारताची आर्थिक परिस्थिती, नोटबंदीचे परिणाम, जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतावर होणारे परिणाम या विषयावर चिदंबरम संवाद साधतील तर कुमार केतकर व अभय ठिपसे हे सध्याच्या परिस्थितीवर स्वत:चे अनुभव कथन करणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील उद्योजक, चार्टर्ड अकौंटंट, वकील, प्राध्यापक, बॅँकिंग क्षेत्र, व्यावसायिकांसाठी हा परिसंवाद महत्त्वाचा ठरणार असल्याने सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजीमंत्री शोभाताई बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे यांनी केले आहे.