केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर
By संजय पाठक | Published: November 17, 2023 05:47 PM2023-11-17T17:47:49+5:302023-11-17T17:48:26+5:30
पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या जानेवारी महिन्यात या पुरस्काराचे वितरण नाशिकमध्येच होणार आहे.
संजय पाठक
नाशिक : पावणे दाेनशे वर्षांची परपंरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा कै. माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम खासदार पुरस्कार नाशिक जिल्ह्यातीलच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. भारती पवार यांना जाहीर करण्यात आला आहे.
पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून, येत्या जानेवारी महिन्यात या पुरस्काराचे वितरण नाशिकमध्येच होणार आहे. स्व. माधवराव लिमये हे जुन्या पिढीतील ज्येष्ठ समाजावादी नेते होते. त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. ते पत्रकार, लेखक तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तळमळीचे कार्यकर्ते होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो. स्व. लिमये यांच्या स्मृतिनिमित्ताने यापूर्वी कार्यक्षम खासदार पुरस्कार दिला जात असे. मात्र, आता या पुरस्काराची व्याप्ती वाढवून वर्षाआड कार्यक्षम खासदार पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार या पुरस्कारासाठी यंदा डॉ. भारती पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती वाचनालयाचे प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके यांनी दिली.